मिरची आणि टोमॅटोचे दर गगनाला भिडले असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा फायदा सगळ्याच शेतकऱ्यांना मिळत नाही. काही शेतकरी मात्र यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवतात.
जालना जिल्ह्यातील खादगाव येथील शेतकरी सुनील साबळे यांनी मिरची उत्पादनातून आर्थिक फायदा मिळवला आहे. अवघ्या 30 गुंठे मिरचीतून त्यांना 2 लाख रुपयांचे मिरची उत्पादन झालं आहे.
सुनील साबळे आणि त्यांचे आणखी दोन भाऊ पूर्णवेळ शेती पाहतात. शहराजवळ गाव असल्याने भाजीपाला पिके घेण्याकडे त्यांचा कल असतो. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी चार बाय एक अंतरावर मिरची रोपांची लागवड केली.
यासाठी लागणारे रोप त्यांनी घरीच तयार केले. लागवड केल्यानंतर योग्य मशागत केली. वेगवेगळी कीटकनाशके आणि खतांचे डोस दिले. पाण्याची बचत व्हावी म्हणून मलचींग पेपर अंथरले. ठिबक सिंचन द्वारे पाणी देण्याची सुविधा केली. यासाठी त्यांना एकूण 50 हजार रुपये खर्च आला.
या तयारीनंतर दोन महिन्यांनी म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मिरची निघण्यास सुरुवात झाली. दर 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळाला. त्यानंतर किंमत वाढू लागली. एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी 50 हजार, तर जून महिन्यात 1 लाख असे एकूण 2 लाखांचे उत्पन्न आतापर्यंत त्यांना झाले आहे. मिरचीचे दर असेच कायम राहिले तर आणखी एक ते दीड लाख रुपयांची कमाई होईल, अशी अपेक्षा सुनील साबळे यांनी व्यक्त केलीय.
आमचा भाजीपाला आणि दुधाचा व्यवसाय आहे. आम्ही दरवर्षी मिरची, टोमॅटो, वांगी अशी भाजीपाला पिके घेत असतो. ही पिकं कधी फेकून देण्याची वेळ येते तर कधी त्यांना चांगला भाव मिळतो. सरासरी 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो. सध्याचा दर कधीतरीच मिळत असल्याचं साबळे यांनी सांगितलं.