राज्यातील अनेक भागात आठवड्याभरात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या या मुद्द्यावरून विधानसभा अधिवेशनही गाजलं. मुख्यमंत्री शिंदेंनी आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नसल्याचं सांगितलं असलं तरी कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता बीडमध्ये मिलेट दौडच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
नांदेड जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पाउस आणि गारपीटीमुळे 4794 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने सादर केला. अजुन पंचनामे सुरूच असुन नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात शुक्रवारी सायंकाळी आणि रात्री झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेकडो एकर वरील उभी पिके आडवी झाली असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
काही भागात गारपीट मोठ्या प्रमाणावर झाली आहे. यामुळे फळबागा, पालेभाज्यांचे नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर होऊन भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने बीड येथे आयोजित मिलेट दौड कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. बीड जिल्हा कृषी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बदलत्या जीवनशैलीत नागरिकांचे आरोग्य आबादीत रहावे यासाठी मिलेट दौडच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्येचे आहारातील महत्व व फायदे बाबत जनजागृती करण्यात आली. या दौड मध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार देखील सहभागी झाले होते.