महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोहे प्रसिद्ध आहेत. आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण पोह्यांमधे वेगवेगळे पदार्थ घालून त्याची चव वाढवतो. कुणाला कांदे पोहे आवडतात, कुणाला दडपे पोहे, कुणाला रस्सा पोहे, कुणाला चणा पोहे, कुणाला दही पोहे तर कुणाला इंदुरी पोहे. नावं काहीही असोत. पण पोह्यांचे दिवाने सगळीकडे आहेत, मग ते महाराष्ट्र असो की इंदूर.
अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात पोह्यांनी करतात. काही लोकांना पोहे जिलेबी आवडते तर काही लोकांना पोहे आणि चहाने एकत्र घ्यायला आवडतो. पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी पोह्यांपासून बनवलेला 'खापोरमोंडा' हा गोड पदार्थ प्रसिद्ध आहे.
इंदूरचे तर हे नॅशनल फूड बनले आहे. पोहे म्हणतात, इंदूरला गेल्यानंतर जर तुम्ही इंदुरी शेव पोहे खाल्ले नाही तर तुम्ही स्वर्गसुख नाकारले. इंदूर आपल्या पोह्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. चला तर जाणून घेऊया पोह्यांचा इतिहास. याबद्दल सविस्तर माहिती indiatimes.com ने दिली आहे.
आपण सर्वांनी एक पौराणिक कथा ऐकली असेल की, जेव्हा गरीब मित्र सुदामा त्यांचे मित्र श्री कृष्णाला भेटायला गेले. तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत पोहे बांधून घेतले होते. अगदी या काळापासून आपल्याकडे पोहे प्रसिद्ध आहेत.
इंडिया टाइम्सनुसार, एका लेखात माहिती दिली गेली आहे की, पोहे ही महाराष्ट्राने जगाला दिलेली देणगी आहे. होळकर आणि सिंधिया राजांमध्ये ते खूप लोकप्रिय झाले. होळकर आणि सिंधिया घराणे मध्य प्रदेशात पोहोचल्यावर हळूहळू पोहे देखील इंदूर आणि मध्य प्रदेशातील इतर शहरांमध्ये स्थायिक झाले. तसेच प्रसिद्ध होऊ लागले.
महाराष्ट्रात तर पोहे आपल्या आवडीनुसार अनेक प्रकारे बनवले जातात. परंतु मध्य प्रदेशात पोहे फक्त कांदे, टोमॅटो आणि मसाले घालून बनवले जातात. इंदूर किंवा मध्य प्रदेशात कांदा आणि लसूणशिवाय पोहे बनतात. तर मध्य प्रदेशातील पोह्यांमध्ये एक पदार्थ आवर्जून टाकला जातो, तो म्हणजे चिवडा किंवा फरसाण आणि तोही तिखट.
टाइम्स ऑफ इंडियाच्या 1846 च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखानुसार, बॉम्बे गॅरिसनने असा आदेश जारी केला होता की, सैनिक सागरी प्रवासाला निघतील तेव्हा प्रत्येकवेळी त्यांना पोहे खायला दिले जातील.
1878 च्या या वृत्तपत्रातील एका लेखामध्ये दिलेल्या माहितीनुसार, सायप्रसमधून भारतात परतणारे काही सैनिक पोह्याच्या मागणीवर ठाम होते आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. प्रवासात सैनिकांसाठी पोहे उत्तम पर्याय होते. गरम पाणी घालून सैनिक ते सहज खाऊ शकत होते.
नैसर्गिक आपत्तीच्या काळातही पोहे हे एखाद्या दैवी वरदानाप्रमाणे आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. 1960 च्या दशकात भारत सरकारने तांदळाच्या कमतरतेमुळे पोह्याचे उत्पादन मर्यादित केले. पोह्यांची पॉवर जाणून घेण्यासाठी तथ्यही पुरेसं आहे.
तर असा आहे पोह्याचा रंजक इतिहास. काही लोकांचा उदरनिर्वाह पोहे विकून चालतो. तर घरापासून दूर राहणाऱ्या लोकांसाठी पोहे वरदान ठरतात. पोहे कुणीही बनवू शकतो आणि कुणीही खाऊ शकतो. मात्र वेगवेगळ्या प्रकारांपैकी तुमचे आवडते पोहे कोणते?