स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही या सर्वांचा वापर हल्ली खूप वाढला आहे. लोक तासंतास स्क्रीनसमोर असतात. काही लोक कामासाठी त्याचा वापर करतात तर काही लोकांना केवळ मोबाईल वापरण्याचे व्यसन आहे. मात्र याचा आपल्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.
रिल्स पाहणे हा आता एक प्रकारचा आजार बनत चालला आहे. रील्स म्हणजे काय आणि ते तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कसे हानी पोहोचवतात याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. एबीपी माझामध्ये याबद्दल सविस्तर वृत्त देण्यात आलं आहे.
रील्स हा इंस्टाग्रामवरील छोट्या छोट्या व्हिडिओचा एक प्रकार आहे. सुरुवातीला हे रील्स 30 सेकंदांचे असायचे पण आता ते 90 सेकंदांपर्यंत वाढवण्यात आले आहे. भारतात टिकटॉक बंद झाल्यावर या रिल्सचा ट्रेंड सुरू झाला आणि आता तो वाढत चालला आहे.
जसे की तुम्हाला माहीतच असेल. रीलमध्ये अनेक प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ गंमतीशीरपणे आणि रंजक पद्धतीने दाखवण्यात येतात. इन्स्टाग्रामवर तुम्हाला सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांचे रील पाहायला मिळतील.
रिल्सचा एक दुष्परिणाम म्हणजे लोक रिल्स पाहण्यात खूप वेळ वाया घालवतात. अशा स्थितीत त्यांच्या कामाचे, अभ्यासाचे नुकसान होते. तसेच यामुळे लोक मानसिक आजारांनादेखील बळी पडत आहेत.
बऱ्याचदा लोक यामुळे डिप्रेशनमध्ये जातात. रील्स पाहून लोक स्वतःतील दोष शोधतात, समोरच्या व्यक्तीशी स्वतःची तुलना सुरू करतात, समोरच्या व्यक्तीसारखे बनण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेक मानसिक समस्यांना आमंत्रण मिळते.
काहीवेळा लोक स्वतः रील्स बनवतात आणि जेव्हा त्यांच्या रिल्सना व्ह्यूज मिळत नाहीत, तेव्हा ते रागीट राग, चिडचिडे होतात. हळूहळू हा तणाव नैराश्यात बदलतो. त्यामुळे मूड स्विंग्स सारख्या समस्याही निर्माण होतात.
लहान मुलं रिल्स पाहण्यात अडकली तर त्यांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होतो. मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यांची रात्रीची झोपही विस्कळीत होते. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण दिनचर्येवर आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.