सामान्यपणे आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 0.8 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जात असाल, तर तुम्हाला तुमच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 1.5 ग्रॅम प्रोटीन आवश्यक आहे.
बऱ्याचदा आपण वजन कमी करण्याच्या नादात प्रोटीनचे सेवन जास्त प्रमाणात करतो आणि हे शरीरासाठी चांगले नसते. यामुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त होते. जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्यावर आपल्या शरीराला हे दुष्परीणाम होतात.
वजन वाढणे : आजकाल बरेच लोक वाढत्या वजनाने त्रस्त असतात आणि ते कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात प्रोटीनचे सेवन करतात. परंतु असे केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. त्यामुळे प्रोटीनचे सेवन प्रमाणातच करायला हवे.
डिहायड्रेशन : रोजच्या आहारात जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्यास डिहायड्रेशन होऊ शकते. प्रोटिन्स पचवण्यासाठी शरीराला भरपूर पाण्याची गरज असते. मात्र लघवीच्या स्वरूपात खूप पाणी शरीरातून बाहेर पडते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते.
डिप्रेशन : प्रोटीन जास्त प्रमाणात घेतल्यास आणि कमी कार्बोहायड्रेट खाल्ल्याने तुम्हाला नैराश्य, चिंता, तणाव आणि नकारात्मक भावना यांच्या समस्या होऊ शकतात. यामुळे तुमच्या शरीरातील ताणतणाव हार्मोन्स वाढून नैराश्य येऊ शकते.
जास्त तहान : जेव्हा तुम्ही भरपूर प्रोटीन खाता. तेव्हा तुमच्या शरीराला आवश्यक तेवढेच पाणी लागते. जर तुम्ही तुमच्या प्रथिनांच्या सेवनासाठी पुरेसे पाणी प्यायले नाही तर जास्त तहान लागण्याची समस्या वाढेल
जास्त थकवा : शरीरात डिहायड्रेशन झाले की थकवा, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. हे कमी कार्बोहायड्रेट सेवन किंवा प्रोटीनच्या जास्त सेवनामुळे होऊ शकते.
बद्धकोष्ठता : प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त नसते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. त्यामुळे प्रोटिन्ससोबत फायबरने समृद्ध असलेले कार्बोहायड्रेट घेणे आवश्यक आहे.