मुंबईत मे महिन्यातील हैराण करणारी उष्णता आणि उकाडा संपून आता मान्सूनचं जोरदार आगमन झालंय. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शहरातील विविध झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं हाल होत असतं.
धो धो कोसळणाऱ्या पावसापासून मुंबईकराच्या दुकानं, घरांचं संरक्षण गरजेचं असतं. पावसापासून घराचे संरक्षण करण्यासाठी काही घरांवर पारंपरिक मातीचे कौल, टिनपत्रे, यासह प्लास्टिक ताडपत्रीचा वापर केला जातो.
बहुतांश गरीब व सामान्य कुटुंबात परिस्थितीमुळे मातीचे कौल टाकणे सुद्धा कठीण असते. अशावेळी पावसापासून बचाव करता यावा यासाठी प्लास्टिकच्या ताडपत्र्या कुडामातीच्या घरावर टाकून कशीबशी पावसापासून सुटका केली जाते.
झोपडपट्टी भागात गळती रोखण्यासाठी घरांवर ताडपत्री टाकली जाते. त्यासाठी मे महिन्यातच मुंबईकर तयारीला लागलेले असतात. त्यामुळे ताडपत्रीला मोठी मागणी असते.
मुंबईतील विविध मार्केटमध्ये ताडपत्रीची दुकाने आहेत. मस्जिद बंदर येथील मार्केटमध्ये ताडपत्री खरेदीसाठी गर्दी होत असते. मुंबईतील बाजारपेठांमध्ये रंगबिरंगी ताडपत्र्या, काळे, सफेद प्लास्टिक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. सर्वाधिक मागणी ब्लू बर्ड आणि एसएससी ब्रॅण्डच्या ताडपत्रीला आहे, असं ताडपत्री व्यावसायिक तौहिद खान सांगतात.
मोहम्मद अली रोड येथील दुकानात ब्लू, ब्लॅक, ऑरेंज अश्या तीन रंगांमध्ये ताडपत्री उपलब्ध आहेत. तसेच या ताडपत्रीवर अतिनील सूर्य किरणांचाही ( UV light protection) परिणाम होत नाही. त्यामुळे त्या 12 महिने चलातात, असंही खान यांनी सांगितलं.
ताडपत्रीवर तिन्ही ऋतूमध्ये कोणताही परिणाम होत नाही. तसेच 8 फुटापासून ते 60 फुटांपर्यंत साईज उपलब्ध आहेत. तर 3 रुपये स्क्वेअर फूट नुसार याचे दर आहेत. सगळ्यात स्वस्त आणि उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा आम्ही पुरवितो, असं टीएनआय प्लास्टिकचे तौहिद खान सांगतात.