आपल्या शरीरावर ऋतूनुसार होणाऱ्या वातावरणातील बदलांचा नक्कीच परिणाम होत असतो. आता नुकताच पावसाळा सुरू झाला आहे वातावरणातील सूर्याची उष्णता कमी होते आणि पाण्याचा अंश वाढत जातो. हवेत थंडावा वाढतो.
या कालावधीत शरीरातील वात वाढतो आणि पित्त जमा होण्यास सुरुवात होते. तसंच पचन शक्ती कमी होते. प्रतिकार शक्ती कमी आणि वातावरणातील जंतुसंसर्ग वाढल्याने आजार वाढतात.
या काळात आजारांपासून वाचण्यासाठी आहार हलका घ्यावा. ज्वारी, जव , नाचणी, गहू इ. धान्यांची भाकरी किंवा चपाती तुपाबरोबर घ्यावी.
चणा, वाटाणा, हरभरा, पावटा, राजमा इ. कडधान्यांचा वापर करू नये. मूग तसंच कमी प्रमाणात मटकी, मसूर, कुळीथ इ. कडधान्ये शरीरातील वात न वाढवता सहज पचतात.
थंड पाणी पिऊ नये. दिवसभर उकळवून गार झालेलं किंवा कोमटच पाणी प्यावं. तसंच तुळशीपत्र टाकलेलं आणि तुरटी फिरवलेलं पाणी प्यावं.
रात्रीचं जेवण शक्य तेवढं लवकर घ्यावं. जेवणानंतर हरडे चूर्ण पाच ग्रॅम आणि सैंधव यांचं मिश्रण कोमट पाण्याबरोबर घ्यावं.