हल्ली तुम्ही अनेक बातम्या ऐकत असाल की अटॅकमुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण गेले आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. ज्यांचे यामुळे प्राण गेले आहे. खरंतर हे लोकांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे होत आहे. लोकांना स्वत:च्या हेल्थकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ज्याचा त्रास होतो. तसेच कामाचं टेंशन अपूरी झोप यासगळ्यामुळे बहुतांश लोकांमध्ये हार्टअटॅक आणि कार्डियाक अरेस्ट सारख्या घटना वाढत आहेत.
अगदी कमी वयाच्या मुलांपासून ते वयो-वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच हृदयाची संबंधीत आजारांनी ग्रासलं आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांना हार्टअटॅक आणि कार्डियाक अरेस्ट या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटतात. पण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हो, हे दोन्ही आजार हृदयाशी संबंधीत असले तरी मेडीकल भाषेत या दोन्ही आजारांची लक्षणं आणि उपचार वेगवेगळे आहे.
कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? कार्डियाक अरेस्ट नेहमीच अचानक होतो, हे येण्यापूर्वी कोणतीही विशिष्ट चिन्हे दिसत नाहीत. यामध्ये हृदय शरीरात रक्त पंप करणे थांबवते आणि व्यक्ती बेशुद्ध पडते. या अवस्थेत त्वरित उपचार न मिळाल्यास काही मिनिटांतच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. हार्ट अटॅक आणि हृदयाच्या असामान्य ठोक्यामुळे कार्डियाक अरेस्ट येतो.
हार्ट अटॅक म्हणजे काय? आजकाल दररोज हजारो लोकांना हार्ट अटॅक येतो, असा एक रिसर्च समोर आला आहे. रक्त गोठणे किंवा हृदयात रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हार्ट अटॅक स्थिती निर्माण होते. हार्ट अटॅक हा मुख्यतः कोरोनरी धमन्यांमधील अडथळ्यामुळे होतो, जो हृदयाला गंभीर नुकसान करून व्यक्तीसाठी धोकादायक ठरू शकतो आणि व्यक्तीचा जीवही घेऊ शकतो.