ढेमसं असं नुसतं म्हटलं जरी तरी अनेकजणांचं तोंड अगदी कडू कारल्यासारखं होतं. आज मला ढेमश्याची भाजी खावीशी वाटतेय, असं आवडीने म्हणणारे जणू अपवादच असतात. मात्र नावडत्या भाजीच्या यादीत असणारी ही ढेमश्याची भाजी अतिशय पौष्टिक असते बरं का...महत्त्वाचं म्हणजे तिची केवळ भाजीच नाही, तर मिठाईदेखील बनवली जाते.
राजस्थानच्या करौली भागातील लोक मागील 70 वर्षांपासून ढेमश्याची मिठाई मोठ्या चवीने खातात. इथल्या एका दुकानात मिळणाऱ्या या मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. करौली शहरातीलच नाही, तर मथुरा आणि आग्र्याहूनही लोक इथे ही मिठाई खरेदी करण्यासाठी येतात. अनेकजण फोनवरून काही किलो मिठाई बनवण्याची ऑर्डर देतात. असं म्हटलं जातं की, ढेमश्याची मिठाई जिभेवर ठेवताच विरघळून जाते. म्हणूनच कोणतीही व्यक्ती केवळ एका तुकड्यावर समाधान मानू शकत नाही, एवढी ती चविष्ट असते.
ढेमश्याची मिठाई बनवणारे झंडू मिठाई भंडारचे कन्हैया लाल शर्मा सांगतात, 'आमच्याकडे केवळ उन्हाळ्याचे 4 महिने ही मिठाई बनवली जाते. ढेमश्याच्या हंगामात आम्ही बाजारातून चांगल्या दर्जाचे कोवळे ढेमसे आणून त्याची मिठाई बनवतो. या मिठाईला तुफान मागणी असते. हा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऑर्डर यायला सुरुवात होते. बऱ्याचदा दुकानातच मिठाई उरत नाही. खरंतर ही मिठाई बनवायला खूप मेहनत लागते. एका व्यक्तीने जर पूर्ण दिवस बसून ही मिठाई बनवायचं ठरवलं तरी केवळ 5 किलोच मिठाई तयार होते.'
ढेमश्याची मिठाई बनवण्यासाठी आधी ढेमसे व्यवस्थित सोलले जातात. मग आतला गर काढून ते कुस्करले जातात. हे तुकडे व्यवस्थितरीत्या शिजवून त्यात खवा, सुकामेवा आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून मिश्रणाची मिठाई वळली जाते. तेव्हाच ढेमश्यात गोडवा येतो. थंडगारपणा हे या मिठाईचं वैशिष्ट्य असतं. ही मिठाई फ्रिजमधून काढल्या काढल्या ग्राहकांना दिली जाते. खरंतर तेव्हाच ती खाण्याची मजा येते.
शहरातील झंडू महाराजांच्या 70 वर्ष जुन्या दुकानात बनवलेल्या जाणाऱ्या या ढेमश्याच्या मिठाईची किंमत 380 रुपये किलो इतकी असते. आपल्यालासुद्धा तिचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण 77339 22370 या क्रमांकावर संपर्क साधून ऑर्डर देऊ शकता.