तेलंगणातील 'महालक्ष्मी टिफिन सेंटर' हे आता हैदराबादी डोसाप्रेमींचं आवडतं ठिकाण झालं आहे. हैदराबाद शहराच्या जुन्या भागातील आघापुरात असलेल्या या भोजनालयात ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे खाद्यप्रेमींना डोसा खाण्यासाठी थोडी वाट पाहावी लागते. मात्र मोठ-मोठ्या तव्यांवर विविध प्रकारचे डोसे बनवताना पाहणं, हीदेखील ग्राहकांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे.
डोसाप्रेमी खासकरून महालक्ष्मी स्पेशल पिझ्झा डोसा, शेझवान क्रीम डोसा आणि स्वीट कॉर्न चीज डोसा खाण्यासाठी याठिकाणी येतात. तसेच बटर डोसा, पनीर डोसा, पालक डोसा, कांदा डोसा यांसह इतर खाद्यपदार्थही इथे मिळतात.
तवा इडली, तवा उपमा आणि म्हैसूर बोंडा हे या भोजनालयातील लोकप्रिय पदार्थ आहेत. त्याचबरोबर शहराच्या जुन्या भागात या भोजनालयाच्या आणखी दोन शाखा आहेत. त्यातील एक शाखा उच्च न्यायालय परिसरात आणि दुसरी शाखा आरामघर मेन रोडवर आहे. दररोज सकाळी सहा वाजता सुरू होणारं हे भोजनालय रात्री 12 वाजता बंद केलं जातं.
महालक्ष्मी टिफिन सेंटरच्या मालकाने सांगितलं, 'आम्ही स्वच्छता पाळून उच्च दर्जाच्या घटकांपासून खाद्यपदार्थ बनवत आहोत. आम्ही ग्राहकांना आमचं दैवत मानतो. चांगली किंवा जेमतेम आर्थिक स्थिती असलेल्या सर्व प्रकारच्या लोकांना परवडतील अशा किंमती आम्ही निश्चित केलेल्या आहे. मसाला डोसा 40 रुपये, बटर डोसा 70 रुपये, घी डोसा 90 रुपये, पालक डोसा 100 रुपये आणि पिझ्झा डोसा 150 रुपयांना विकला जातो.
दरम्यान, 'डोसा' हा एक अत्यंत लोकप्रिय दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आहे. संपूर्ण भारतासह श्रीलंकेतही तो आवडीने खाल्ला जातो. तांदूळ आणि उडीद डाळीचं पीठ आंबवून डोसा बनवला जातो. सर्वसाधारणपणे लोक बटाट्याची भाजी, सांबार आणि नारळाच्या चटणीबरोबर डोसा खाणं पसंत करतात. डोश्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. तांदूळ आणि उडिदामुळे तो प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो. तेलाचा वापर न करता बनवलेल्या साध्या घरगुती डोश्यामध्ये सुमारे 112 कॅलरीज असतात. शिवाय आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे त्यातील बी आणि सी जीवनसत्त्वांचं प्रमाणही वाढतं.