अभिनेता, सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांची प्रकृती खालावल्याने शुक्रवारी त्यांना हैदराबादमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रजनीकांत यांना ब्लड प्रेशरचा त्रास होत होता. त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत एक गुड न्यूज समोर आली आहे. आज संध्याकाळी रजनीकांत यांना डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांच्या तब्येतीची माहिती त्याचे भाऊ सत्य नारायण यांनी दिली.
अपोलो हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या मेडिकल बुलेटीनमध्ये हे दिसून आलं, की त्यांची तब्येत आता स्थिर आहे. पुन्हा एकदा त्यांच्या तब्येतीची तपासणी करण्यात येईल.
हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये अन्नाथे सिनेमाचं शूटिंग करत होते. मात्र शूटिंगच्या क्रूमधील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं. अन्नाथे (Annaatthe shooting) या सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं होतं. 22 डिसेंबर रोजी रजनीकांत यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. त्या दिवसापासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. मात्र सध्या त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हैदराबादमधीलच रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
तेलंगणाच्या राज्यपालांनी रजनीकांत यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांकडे विचारपूस केली आहे आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. तसंच कमल हसन यांनीही रजनीकांत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. दक्षिण भारतामध्ये रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग आहे.