उद्या आहे फ्रेंडशिप डे म्हणजे दोस्त यारांना समर्पित केलेला खास दिवस. अनेकांना या दिवशी आपल्या अगदी घट्ट मैत्री असलेल्या मित्रांची आठवण नक्कीच येईल. मराठी इंडस्ट्रीपासून ते अगदी बॉलिवूडपर्यंत अशा अनेक फिल्म आहेत ज्यामध्ये मैत्रीचं एक सुंदर नातं दाखवलं आहे.
मैत्री म्हणलं आणि अशी ही बनवाबनवी या सिनेमाचा उल्लेख केला नाही कसं चालेल? हा सिनेमा चार अतरंगी मित्रांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. असे काही सिनेमे असतात जे कितीही वेळा पाहिले तरी त्याचा कंटाळा येत नाही त्यातलाच हा आयकॉनिक सिनेमा आहे. 1988 रोजी आलेल्या या सिनेमाची जादू आजही तशीच आहे.
बॉलिवूडमधील 3 इडिट्स या सिनेमा सुद्धा असंच एका खऱ्या मैत्रीची साक्ष देणारा सिनेमा आहे. रँचो, फरहान, राजू या तीन मित्रांची गोष्ट यात दाखवली आहे. तसंच शिक्षण संस्थेवर सुद्धा भाष्य करणारा आमिर खानचा हा एक उत्तम सिनेमा आहे.
क्लासमेट्स हा आदित्य सरपोतदार दिग्दर्शित सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. एका अतरंगी गॅंग आणि कॉलेजच्या दिवसांची आठवण हा चित्रपट बघितल्यावर नक्कीच होईल. तसंच या सिनेमात अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर असे मराठीतील अनेक सुपरहिट कलाकार सुद्धा आहेत.
यह जवानी है दिवानी हा सिनेमा सुद्धा फ्रेंडशिप डे साठी एक उत्तम उदाहरण आहे. नैना बनी यांच्या प्रेमकहाणीसह सिनेमामध्ये नैना, बनी, अदिती आणि अवि यांच्या दोस्तीचे सुद्धा अनेक किस्से दिसून येतात. स्वतःच्या स्वप्नांकडे वेगळ्या दृष्टीने बघायला शिकवणारा हा एक अफलातून सिनेमा आहे.
दोस्ती आणि यारीवर सिनेमे आहेत आणि दुनियादारी सिनेमा नसेल तर चालणार नाही. फ्रेंडशिप डे साठी अगदी परफेक्ट असलेला हा सिनेमा संजय जाधव यांनी दिग्दर्शित केला आहे. 'तेरी मेरी यारी मग खड्ड्यात गेली दुनियादारी असा दमदार डायलॉग सुद्धा सिनेमात आहे. श्रेया आणि शिरीन यांच्या लव्हस्टोरीसोबत श्रेया आणि दिग्याची मैत्री सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसंच सिनेमातील गाणी सुद्धा बहारदार आहेत.
दोस्तांच्या जगात लोकप्रिय असणारा अजून एक चित्रपट म्हणजे दिल चाहता है. 2000 दशकाच्या सुरुवातीला आलेल्या या सिनेमाने मैत्रीची एक वेगळी व्याख्या दाखवून दिली. गोव्याला या सिनेमाच्या आणि तीन मित्रांच्या नावाने एक किल्ला सुद्धा प्रसिद्ध आहे.
बॉक्स ऑफिसवर नुकताच भरघोस कमाई करून गेलेला झिम्मा हा सिनेमा सुद्धा एक दोन नाही तर चक्क सात बायकांच्या मैत्रीची अनोखी गोष्ट दाखवतो. जिथे बायकांना नेहमी एकत्र आल्यावर भांडणं करतात असं सतत ऐकवलं जातं तिथे ही प्रतिमा मोडून काढत या सात अनोळखी महिला एकमेकांशी कशी मैत्री करतात आणि लंडन शहर फिरतात यावर आधारित हा गोड सिनेमा आहे.
बॉलिवूडमधील अजून एक लोकप्रिय सिनेमा म्हणजे जिंदगी ना मिलेगी दोबारा. नुसतीच मैत्री नाही तर खूप सारी मजा आणि थ्रिलने भरलेला हा सिनेमा सुद्धा तीन मित्र आणि त्यांची एक खास ट्रिप यावर भाष्य करणारा आहे.