आज भारती देशातील एक प्रमुख आणि यशस्वी कॉमेडियनपैकी एक आहे. जबरदस्त कॉमेडी करणारी भारती स्वतःवरही जोक करुन लोकांना हसवत असते. रंग, रुप नसतानाही आपल्यातील कौशल्याच्या जोरावर आज ती टेलिव्हिजन क्षेत्रात स्वतःच्या पायावर यशस्वीपणे उभी आहे.
भारती टेलिव्हिजन जगतातील एक ओळखीचा चेहरा आहे. जो कॉमेडीसाठी खूप प्रसिद्ध आहे. भारतीने एक स्पर्धक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. आज ती अनेक शो होस्ट करते त्याचबरोबर जज म्हणूनही कार्यरत आहे.
कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या एका मुलीने एवढ्या उंचीवर आपले नाव नेले आहे. पण तिला या प्रवासात मोठा संघर्ष करावा लागला आहे. आज टेलिव्हिजन क्षेत्रात तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतातील मोजक्या कॉमेडियन कलाकारांमध्ये तिचे नाव घेतले जाते. तिचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. एकवेळ अशी होती की तिला 5 रूपयच्या ज्यूसच्या ग्लासवर दिवस काढावा लागत असे.
भारती सिंगचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. भारतीच्या आईचे नाव कमला आहे. भारती लहान असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. वडील गेल्यानंतर तिच्या आईने भारती आणि तिच्या भावंडांचे पालनपोषण केले. भारतीला एक भाऊ एक बहीण आहे. भारती आणि तिची बहीण पिंकी अगदी एकसारख्या दिसतात.
भारती सिंहने एका मुलाखतीत सांगितले होते की, रायफल शूटिंगमुळे मला कॉलेजमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून अॅडमिशन मिळाले होते. त्याचबरोबर मला दररोज 15 रुपये मिळत असत. यात 5-5 रुपयांचे तीन कूपन दिले जात. एका कुपनवर एक ग्लास ज्यूस मिळत असत.
ती पुढे म्हणाली की, तुम्हाला विश्वास वाटणार नाही, मी फक्त एक ग्लास ज्यूस पीत असत. ते पण यासाठी की तासन्तास चालणाऱ्या रायफल शूटिंगच्या सरावादरम्यान एनर्जी मिळावी. मी इतर कूपन्स वाचवून ठेवत असत. महिन्याच्या शेवटी सर्व कुपन्स देऊन त्याबदल्यात फळे किंवा ज्यूस घेत असत. त्यानंतर मी ते घरीही घेऊन जात असत.
भारतीने आपल्या करिअरची सुरुवात 'इंडियन लाफ्टर चॅलेंज'पासून केली होती. त्यानंतर ती अनेक कॉमेडी शोजमध्ये दिसली. यात कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाइट्स बचाओसारख्या शोजचा समावेश आहे.
ती फक्त कॉमेडियनच नव्हे तर एक चांगली डान्सरही आहे. मध्यंतरी भारतीने 'खतरा है' या रियालिटी शोचे अँकरिंगही केले. त्याचबरोबर तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. आज भारतीचा वाढदिवस आहे, तिच्याव सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.