बिग बॉस मराठी 4 ची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते. चौथ्या सीझनमध्ये 16 स्पर्धकांनी एंट्री केली. एकाहून एक तगडे स्पर्धक प्रेक्षकांच्या भेटीला आले.
एकामागून एक स्पर्धक घराचा निरोप घेत आहेत. आता घरात किरण माने, प्रसाद जवादे अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, अरोह वेलणकर हे सदस्य राहिले आहेत.
बिग बॉस मराठी 4 चा ग्रँड फिनाले 8 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. कलर्स मराठी वाहिनीनं अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.
बिग बॉस मराठीच्या विजेत्याला आधी 25 लाखांचं बक्षीस आणि ट्रॉफी मिळणार होती. पण कॅप्टन्सी कार्यादरम्यान यातील जवळजवळ अर्धी रक्कम कमी झाली.
कॅप्टन की बक्षिसाची रक्कम यातील एक पर्याय सदस्यांना निवडायचा होता. सदस्यांनी बझर वाजवून कॅप्टनी कार्यातून बाद होत बक्षिसाची रक्कम कायम ठेवायची होती.
टास्क सुरू झाल्यानंतर 20 सेकंदांनी 24 लाख रक्कम वाचवत अक्षय केळकरने कॅप्टन्सी कार्यातून माघार घेत त्याच्या नावाची पाटी एटीएम मशिनमध्ये टाकली. त्यानंतर पुढच्या 10 सेकंदात किरण माने व अपूर्वा नेमळेकर कॅप्टन्सी कार्यातून बाहेर पडले.
आरोह वेलणकर व प्रसाद जवादे यांच्यात टास्कमध्ये माघार घेण्यावर वाद झाले. बक्षिसाची रक्कम आठ लाखावर आल्यानंतर प्रसाद कॅप्टन्सी कार्यातून बाहेर पडला. त्यानंतर 10 सेकंदात अमृता धोंगडेनेही तिच्या नावाची पाटी एटीएम मशीनमध्ये टाकली.
कॅप्टन्सी कार्यात आरोह वेलणकर विजयी ठरल्यामुळे तो घरातील शेवटचा कॅप्टन ठरला आहे. परंतु, आता ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाच्या विजेत्याला ट्रॉफी व केवळ आठ लाख रुपये मिळणार आहेत.