बिग बॉस मराठी सिझन 4 हा लवकरच सुरु होणार असे संकेत मिळाले आहेत. या रिऍलिटी शोचे मागचे तीनही सिझन प्रचंड गाजले असल्याने आता चौथ्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे. बिग बॉस साठी निवडलं जाणं ही एक मोठी प्रोसेस असते असं सांगितलं जातं. कार्यक्रमामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे नेमकं समोर आलं नसलं तरी एक संभाव्य यादी मात्र viral होताना दिसत आहे.
बिग बॉस खबरी नावाच्या इंस्टग्रॅम पेजवरून ही संभाव्य स्पर्धकांची यादी शेअर करण्यात आली आहे. तसंच काही युट्युब व्हिडिओमध्ये सुद्धा अनेक कलाकारांच्या नावांची चर्चा होत आहे. तर या यादीनुसार खालील आघाडीचे कलाकार कदाचित कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या यादीत पहिलं नाव आहे तुझ्यात जीव रंगलामधील राणा दा म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी. हार्दिक बिग बॉस मध्ये जाणार अशा चर्चा गेले अनेक दिवस जोर धरताना दिसत आहेत. याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण त्याने दिलं नसलं तरी त्याच्याबद्दल खूप तर्क वितर्क लढवले जात आहेत. हार्दिकने नुकताच मालिकेतील त्याची रील बायको असणाऱ्या अक्षया देवधरसोबत साखरपुडा केला आहे.
यादीत दुसरं संभाव्य नाव आहे किरण माने यांचं. किरण माने हे एका मालिकेच्या कॉंट्रोव्हर्सीचा भाग राहिले आहेत. त्या घटनेमुळे त्यांना मालिका सोडावी सुद्धा लागली तसंच त्यांच्यावर बरेच आरोप सुद्धा लावण्यात आले होते. किरण आपल्या बेधडक आणि स्पष्ट मतांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सुद्धा या संभाव्य यादीचा भाग आहे. प्राजक्ताच्या बाबतीत सुद्धा मागच्या वर्षी एक मोठी कॉंट्रोव्हर्सी झाली होती. तिच्या वागणुकीमुळे तिला आई माझी काळूबाई मालिका सोडावी लागली होती असं सांगण्यात येतं.
सिनेसृष्टीत अनेकवर्ष कार्यरत असणाऱ्या शुभांगी गोखले यांचं नाव सुद्धा बिग बॉस मराठीसाठी गणलं जात आहे. शुभांगी या अभिनेत्री सखी गोखलेच्या आई असून त्या नुकत्याच मालिकांमध्ये दिसून आल्या होत्या.
देवमाणूस मालिकेत झळकलेली अभिनेत्री नेहा खानचं नाव सुद्धा बिग बॉससाठी यादीमध्ये आल्याचं दिसून आलं आहे. नेहा सुद्धा बरीच लोकप्रिय अभिनेत्री असून ती कार्यक्रमात जाणार का हे बघावं लागेल.
माहेरची साडी फेम अभिनेत्री अलका कुबल यांचं नाव सुद्धा बिग बॉससाठी घेतलं जात आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांच्यात मालिकेदरम्यान वाद झाले होते. अलका यांनी प्राजक्तावर बरेच आरोप सुद्धा केले होते. त्यामुळे प्राजक्तासह अलका यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेली अभिनेत्री सोनल पवार हिचं नावदेखील या संभाव्य यादीचा भाग आहे. आता सोनल नेमकी यामध्ये दिसेल का नाही हे वेळ आल्यावर कळेल.
अभिनेत्री रुचिरा जाधव हिचं नाव सुद्धा बिग बॉस मराठीसाठी बरच चर्चेत येताना दिसत आहे. रुचिरा सुद्धा अनेक मालिका आणि वेबसिरीजचा भाग होती.
अनेकवर्ष मालिका आणि सिनेजगतात कार्यरत असणारी अभिनेत्री शर्वरी लोहकरे हिच नाव सुद्धा या कार्यक्रमाच्या संभाव्य यादीत जोडलं गेलं आहे. सध्या शर्वरी तुमची मुलगी काय करते मालिकेत एका हटके भूमिकेत दिसत आहे.
खुलत काली खुलेना मालिकेतून झळकलेला चेहरा अर्थात ओमप्रकाश शिंदे सुद्धा बिग बॉसच्या नव्या सिझनचा भाग होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ओमप्रकाशच्या येण्याने खेळात रंगत वाढेल हे नक्की अशी प्रतिक्रियाही समोर येत आहे.
ती फुलराणी मालिकेत झळकलेली अभिनेत्री दीप्ती लेले सुद्धा बिग बॉसमध्ये दिसू शकेल असं यादीनुसार समोर आलं आहे. दीप्ती ही महेश मांजरेकर यांच्या पांघरूण सिनेमातही दिसून आली होती.
अनिकेत विश्वासराव हा अभिनेता देखील बिग बॉसमध्ये दिसण्याची शक्यता जास्त असल्याचं समोर आलं आहे. अनिकेत सध्या एक नाटक करत असून त्याचे प्रयोग उत्तम सुरु आहेत. अनिकेतवर मागच्या काळात बायको स्नेहल चव्हाण हिने घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते.
लागिरं झालं जी मालिकेत दिसून आलेला अभिनेता निखिल चव्हाणचं नाव सुद्धा बिग बॉससाठी घेतलं जात आहे. तो नुकताच डार्लिंग सिनेमात दिसून आला होता.