जग कोरोनामुळे हैराण झालेलं असताना शास्त्रज्ञांनी एक महत्वाचं संशोधन केलं आहे. या संशोधनामधून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. सध्या फ्लूचा प्रभाव काहीसा कमी होत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे फ्लूच्या रुग्णांमध्ये घट झाली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्विलांस डेटामधून ही माहिती समोर आली आहे की, फ्लूच्या रुग्णांमध्ये गेल्या वर्षी पेक्षा 98 टक्के घट झाली आहे. उदाहरणच द्याचं झालं तर, 2020 च्या एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये फक्त 14 फ्लूच्या केसेस समोर आल्या होत्या. गेल्या वर्षी हीच संख्या 367 होती.
WHOच्या रिपोर्टनुसार एन्फ्लूएंजा व्हायरस म्हणजे फ्लू हा साधा वाटणारा रोग आहे. पण या रोगामुळे दर वर्षाला जगभरात 5 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. लिव्हरपूल विद्यापीठातील व्हायरस तज्ज्ञ प्राध्यापक जेम्स स्टीवार्ट यांनी सांगितलं की, आपली प्रतिकारशक्ती संक्रमण झाल्यानंतर सक्रीय होते. त्यानंतर व्हायरसला नष्ट करते. या दरम्यान जर शरीरात इतर कोणत्याही व्हायरसचा प्रवेश झाल तर कोरोनाच्या संक्रमणाने विकसित झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे फ्लू या आजाराचा व्हायरस जास्त वेळ टिकू शकत नाही.
सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या वायरोलॉजिस्ट एलिसाबेट्टा ग्रोपेल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषाणू परजिवी असतात. एकदा व्हायरसने माणसाच्या शरीरात प्रवेश केला की, तो इतर व्हायरसला नष्ट करतो. आणि पुन्हा प्रवेश करण्यापासून रोखतो.
कोरोनामुळे काही प्रमाणात फ्लूच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. असं असलं तरी फ्लू आणि कोरोना याबाबत अधिक संशोधन होणं गरजेचं आहे.