आंबा म्हंटलं की, कोकणच्या अस्सल हापूस आंब्याचं नाव सर्वप्रथम नजरेसमोर येतं. पण हापूससह रत्ना, पायरी, निलम अशा तब्बल 32 जातींचे कोकणातील आंबे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे. गोडसर, केशरी-पिवळसर रंगाच्या आंब्याच्या लागवडीसाठी कोकणची माती, हवा कशाप्रकारे अनुकूल आहे, याची माहिती ऐकता येईल.
'ग्लोबल कोकण' आणि 'कोकण भूमी' प्रतिष्ठानतर्फे पुढाकार घेत ’मँगो फ्ली’ उपक्रमांतर्गत घाटकोपर येथील आरसिटी मॉलमध्ये 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे.
कोकणच्या शेतातून ते थेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध असणार्या हापूसची ग्राहकांना खरेदी करता येईल. याचे उद्घाटन 29 एप्रिल रोजी करण्यात आलं.
रत्नागिरी, पावस, मालवण, राजापूर, विजयदुर्ग आदी भागातील हापूसचे 10 स्टॉल्स लावण्यात आले असून खुद्द शेतकरी यांची विक्री करणार आहेत. या माध्यमातून 350 हून अधिक शेतकऱ्यांना विक्री केंद्र उपलब्ध झालं आहे.
हापूस आंब्याचा ’लोकल ते ग्लोबल’ ब्रँड विकसित करत शेतकऱ्यांना व्रिकीसाठी नवीन व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असून मॉल्स, महामार्ग, लोकल बाजार ते परदेशात आंबा विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे ’कोकण भूमी प्रतिष्ठान’चे संस्थापक संजय यादवराव म्हणाले.