मिझोरमध्ये जगभरातील सर्वात मोठा परिवार एकाच छताखाली राहतो. कोरोनाचा कोणताही परिणाम या परिवारावर झालेला नाही आहे. 74 वर्षीय जियोना चाना यांचा हा परिवार असून या कुटुंबामध्ये एकूण 181 सदस्य आहेत.
हे एवढं मोठं कुटुंब 100 खोल्या असणाऱ्या घरामध्ये राहतात. कुटुंब प्रमुख असणाऱ्या जियोना चाना यांच्या 39 पत्नी, 94 मुलं, 14 सुना तर 33 नातवंड आहेत. त्यांना एक छोटा पणतू पण आहे.
मिझोरममधील बटवंग गावामध्ये हे कुटुंब राहतं. एवढे जण एकत्र राहुनही कोरोना त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्यांचा संपूर्ण परिवार एका समाजाप्रमाणेच आहे. घरासाठी लागणाऱ्या वस्तू कुटुंबातील सदस्य स्वत:च बनवतात
100 खोल्या असणाऱ्या या घरात सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. त्यांचं स्वयंपाक घर एकच आहे. मात्र बाकी प्रत्येकाच्या वेगळ्या खोल्या आहेत. जिओना यांच्या शिस्तीप्रमाणे सर्वजण मिळून काम करतात. मिझोरममध्ये आतापर्यंत एकच कोरोना रुग्ण आढळला असला, तरीही प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे जिओना यांचा परिवार देखील संक्रमणापासून बचाव करण्यासाठी योग्य खबरदारी घेत आहे.
घरातील महिला शेतीचं काम पाहतात. जिओना यांची सर्वात मोठी पत्नी यामध्ये प्रमुख आहे. त्याचप्रमाणे घरात वाटून दिलेल्या कामामध्ये देखील त्या लक्ष ठेवून असतात.
या परिवारात दररोज 45 किलो तांदूळ,30-40 कोंबड्या, 25 किलो डाळ, काही डझनभर अंडी, 60 किलो भाजी शिजवली जाते. दररोज 20 किलो फळं देखील संपतात. हे सर्व त्यांच्या शेतातच उगवलं जातं. या कुटुंबाच्या फळबागा देखील आहेत तर गेल्या काही वर्षात त्यांनी पोल्ट्री फार्म सुद्धा सुरू केलं आहे.
चाना परिवाराचा मोठा दबदबा आहे. एकत्र एवढे सगळी मतं मिळत असल्याने नेतेमंडळींचे सुद्धा त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या परिवाराचा नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा सामाविष्ट आहे. एवढच नव्हे घरच्या घरी अनेक स्पर्धांचं आयोजन देखील चाना परिवारात केलं जातं.
जियोना चाना यांच्या 52 वर्षांच्या सर्वात मोठ्या मुलाचं नाव पारलियाना आहे. अनेक लग्न करण्यास परवानगी देणाऱ्या आदिवासी समाजातून जियोना आल्याने त्यांनी 39 लग्न केल्याची माहिती पारलियाना यांनी दिली. वडिलांनी गरीब मुलींशी लग्न करून त्यांना घर मिळवून दिल्याचं पारलियाना सांगतात