मुंबई, 2 एप्रिल- झी मराठी वाहिनीवरील यशोदा गोष्ट श्यामच्या आईची ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी आजवर अनेक मनोरंजक मालिकांचे दिग्दर्शन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे, मालिकेत वरदा देवधर हिने यशोदाची म्हणजेच छोट्या बयोची प्रमुख भूमिका साकारली आहे. मालिकेत छोट्या बालकलाकारांची धमाल प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. छोट्या बयोचे लग्न होऊ नये म्हणून, तिची भावंडं आणि सोबतच तिचा होणारा नवरा सुद्धा देवी आईकडे साकडं घालताना पाहायला मिळाली.त्यात चिमुरड्या सखूची धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सर्वांना सखूची भूमिका आणि तिचा निरागस अभिनय देखील खूप भावला आहे. सखूबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. वाचा- बादशाह लवकरच दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? लग्नाच्या चर्चांवर रॅपरने सोडलं मौन मालिकेत देवी आईने विरोधात कौल दिलेला असल्याने ही सखू चक्क सगळ्यांचे डोळे मिटलेले असताना गुपचूप जाऊन देवीचा कौल बदलते. आपण चुकलोय हे तिला सांगायचे असते, मात्र कोणीही त्यांकडे लक्ष्य देत नाही. जे पाहून ती स्वतःच्याच चुकीवर विचार करायला लागते. चिमुरड्या सखूचा हाच निरागसपणा प्रेक्षकांना खूप भावला आहे. सखूचे बोबडे बोलणे आणि मध्येच गमतीशीर वक्तव्य करणे अनेकदा अडचणीत आणणारे ठरते. मात्र तिची ही धमाल पाहायला प्रेक्षकांना खूप भावली आहे.
मालिकेत सखूची भूमिका बालकलाकार ओवी करमरकर हिने साकारली आहे. ओवी ही अतिशय गुणी बालकलाकार आहे. . ओवी शाळेतही जाते, लवकरच तिची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे सेटवरच तिच्या अभ्यासाची तयारी असते. ओवी डोंबिवली येथे वास्तव्यास आहे. तिचे वडील विपुल करमरकर आणि आई धनदा हे नेहमी सेटवर हजेरी लावतात. मालिकेच्या ऑडिशनला ओवीने मनं जिंकून घेतल्याने तिला मालिकेत सगळ्यात छोट्या भूमिकेसाठी निवडण्यात आले.
या मालिकेत रोहिणी हट्टंगडी, नयना आपटे, अभिजीत चव्हाण, गुरुराज अवधानी, ऋग्वेदी प्रधान, अनिल गवस, दिनेश कानडे. सृष्टी पगारे, अशोक समेळ, तारका पेडणेकर असे कलाकार आहेत. झी मराठीवरील उंच माझा झोका, स्वामिनी, राधा प्रेमरंगी रंगली, या सुखांनो या, वहिनीसाहेब अशा दर्जेदार मालिकांचे दिग्दर्शन विरेंद्र प्रधान यांनीच केले होते. आता त्यांची ही मालिका देखील प्रेक्षकांच्या मनांवर आधिराज्य गाजवत आहे.