मुंबई, 26 जुलै : वजन कमी करणे हे बहुतेक लोकांसाठी मोठं आव्हान असतं. अनेकजण खूप प्रयत्न करतात पण वजन कमी होत नाही. काही लोक थोडे कष्ट करून वजन कमी करतात तर काही लोक खूप मेहनत करूनही वजन कमी करू शकत नाहीत. अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी रोज किती किलोमीटर चालणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला 10 किलो वजन कमी करायचे असेल तर दररोज किती चालणे आवश्यक आहे? तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील. 100 कॅलरीज बर्न करण्यासाठी 2 किलोमीटर चालणं गरजेचं वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर चाललं पाहिजं याची कोणतीही ठरावीक पद्धत किंवा प्रमाण नाही. यासाठी वेगवेगळ्या लोकांचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. कारण याला अनेक घटक कारणीभूत असतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, 1 मैल म्हणजेच 1.6 किलोमीटर चालल्यास 55 ते 140 कॅलरीज बर्न होतात. तुमच्या चालण्याचा वेग किती आहे यावर ते अवलंबून असतं. ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार दररोज किमान 150 मिनिटे मध्यम गतीने चालणे आवश्यक आहे. तुम्ही वेगाने चालत असाल तर तुम्ही ते 75 मिनिटे करू शकता. 10 किलो वजन कमी करण्यासाठी किती चालावे? तसे पाहिल्यास आजकाल दररोज 10 हजार पावले चालण्याचा सल्ला दिला जातो. पण चालत जाऊन किती किलो वजन कमी करता येईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याचे उत्तर असे आहे की यामुळे प्रत्येक व्यक्तीचे वजन वेगवेगळ्या प्रकारे कमी होईल. काही लोक एका महिन्यात 10 किलो वजन कमी करू शकतात, तर काही लोकांना 10 किलो वजन कमी करण्यासाठी 2 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. वजन किती कमी होईल यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. वजन कमी होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात सर गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि पॅनक्रियाटिको बिलीरी सायन्सेसचे सल्लागार डॉ. श्रीहरी अनिखिंडी म्हणतात की, तुमचे वजन किती प्रमाणात कमी होते ही बाब अनेक घटकांवर अवलंबून असते. साधारणपणे वजन कमी करण्यासाठी वेगवान व्यायामाची शिफारस केली जाते. वेगवान व्यायाम म्हणजे जेव्हा तुम्ही चालता तेव्हा त्याचा वेग कमीत कमी 6 किलोमीटर प्रति तास असावा. जर एखादी व्यक्ती यापेक्षा जास्त वेगाने चालत असेल किंवा धावत असेल तर तिचे वजन वेगाने कमी होईल. केवळ चालण्याने वजन कमी होणार नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारावरही नियंत्रण ठेवावे लागेल. आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करावा लागतो. त्याचबरोबर आहाराचे प्रमाणही कमी करावे लागते. याशिवाय पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवन हेही वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.