आग्रा, 28 एप्रिल : ताजमहाल (Taj Mahal) हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. ताजमहाल हा मुघल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. दर वर्षी जगभरातून लाखो पर्यटक ही वास्तू पाहण्यासाठी येतात. ताजमहालच्या देखभालीची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे आहे. या विभागाने पर्यटकांसाठी विशेष नियमावली (Rules) तयार केली आहे. त्यानुसार, ताजमहाल परिसरात काही विशिष्ट वस्तू, धार्मिक प्रतीक चिन्हं, तसंच पूजासामग्री आणि हत्यारं नेण्यावर निर्बंध आहेत. या नियमावलीमुळे जगद्गुरू परमाहंसाचार्य (Jagadguru Paramahansacharya) ताजमहालामध्ये प्रवेश करू शकले नाहीत. जगद्गुरू परमहंसाचार्यांना ताजमहालमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. तिकीट खरेदी करूनही त्यांना प्रवेश नाकारला गेला. हातात ब्रह्मदंड (Brahmdand) असल्याने त्यांना ताजमहालमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याचं बोललं जात आहे. `आज तक`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. जगद्गुरू परमहंसाचार्य यांनी आपल्याला ताजमहालमध्ये जाण्यापासून रोखलं गेल्याचा आरोप केला आहे. परमाहंसाचार्य यांनी भगवं वस्त्र परिधान केले असल्यानं त्यांना ताजमहालात जाण्यापासून रोखण्यात आलं, असा आरोप केला जात आहे; मात्र जगद्गुरू परमहंसाचार्य यांच्या ब्रह्मदंडाबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे त्यांना आत सोडण्यात न आल्याचं भारतीय पुरातत्व विभागाचं (Archaeological Survey of India) म्हणणं आहे. त्यांचा ब्रह्मदंड कापडाने झाकलेला होता. त्यामुळे त्यामध्ये काय आहे हे एएसआय अधिकाऱ्यांना स्पष्ट होत नव्हतं. ताजमहालच्या देखभालीची जबाबदारी सांभाळणाऱ्या पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक, पुरातत्त्व शास्त्रज्ञ राजकुमार पटेल यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, `हे संत लोखंडाचा दंड घेऊन जात असल्याची माहिती सुरुवातीला मिळाली होती. त्यामुळे कदाचित त्यांना ताजमहालमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं असावं. त्यांना दंड प्रवेशद्वारावर ठेवून आत जाण्यास सांगितलं. परंतु, ते यासाठी तयार नव्हते. भगवे कपडे परिधान केले म्हणून त्यांना रोखण्यात आलेलं नाही.` यावर संत परमाहंसाचार्य यांनी सांगितलं, `धर्मदंड किंवा ब्रह्मदंड हा लोखंडाचा नसतो. तो बांबू आणि खास लाकडापासून तयार केलेला असतो. तसंच तो मंत्रांनी अभिमंत्रित केलेला असतो. ब्रह्मदंड बाहेरून कापडाने झाकलेला असतो. हा ब्रह्मदंड पूज्य आणि दिव्य असतो.` राजस्थानात राजकीय भूकंपाचे संकेत, सचिन पायलट यांचा काँग्रेस हायकमांडला इशारा, गहलोत सरकारला सुरुंग लागणार? ताजमहालमध्ये जाण्यासाठी, तसंच त्या परिसरात फिरण्यासाठी संबंधित विभागाने काही नियम तयार केलेले आहेत. ताजमहालमध्ये धार्मिक चिन्हं आणि पूजासाहित्य नेण्यास बंदी आहे. भगव्या रंगाचा रामनाम असलेला दुपट्टा परिधान करून आलेल्या परदेशी मॉडेल्सना ताजमहालमध्ये 2017 साली सुरक्षेदरम्यान रोखण्यात आलं होतं. तसंच 2012 मध्ये वनवासी सत्संग समितीच्या सदस्यांना रामनामाचा उल्लेख असलेलं एकेरी वस्त्र काढून टाकण्यास सांगण्यात आलं होतं. ताजमहालमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी काही नियम आहेत. तसंच काही गोष्टी सोबत घेऊन जाण्यावरही बंदी आहे. ताजमहालमध्ये ड्रोन कॅमेरा (Drone Camera) नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. तसंच ताजमहाल परिसरात खाद्यपदार्थ खाण्यास, धूम्रपान करण्यास मनाई आहे. याशिवाय शस्त्रं, दारूगोळा, ज्वलनशील वस्तू, धूम्रपानाचं साहित्य, तंबाखूजन्य पदार्थ, दारू, चॉकलेट, हेडफोन, चाकू, वायर, मोबाइल चार्जर, इलेक्ट्रिक वस्तू (कॅमेरा वगळता), ट्रायपॉड नेण्यावरदेखील बंदी आहे. मकबऱ्यात मोठ्या आवाजात बोलण्यास बंदी आहे. या स्मारकात जाताना मोठ्या बॅग्ज, पुस्तकं घेऊन जाणं टाळावं. अन्यथा सुरक्षा तपासणीत निष्कारण वेळ जाऊ शकतो. मुख्य मकबऱ्यामध्ये फोटोग्राफी करण्यास बंदी आहे. ताजमहाल परिसरात फिरताना मोबाइल फोन स्विच ऑफ किंवा सायलेंट मोडवर ठेवावा लागतो. स्मारकाच्या भिंती किंवा पृष्ठभागांना स्पर्श करणं आणि स्क्रॅच करणं टाळावं. कारण हे वारसास्थळ असल्यानं त्याची विशेष काळजी घेतली जाते. रात्रीच्या वेळी ताजमहाल पाहण्यासाठी व्हिडिओ कॅमेरा, अतिरिक्त बॅटरीज नेण्यास बंदी आहे. परंतु, तुम्ही स्टिल कॅमेरा त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.