नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : दिवाळीजवळ (DIWALI) आली की गृहिणींना घराच्या साफसफाईचे वेध लागतात. घरातले सगळे मिळून घराची साफसफाई करतात. अनेकजण घराला नवीन रंगही देतात. एकूणच लक्ष्मी पूजनाच्या आधी आपलं घर लख्ख असावं अशीच प्रत्येकाची इच्छा असते. यामुळे घरामध्ये एक सकारात्मक उर्जाही निर्माण होते. तुम्हीही तुमच्या घराची साफसफाई केलीच असेल. पण जर तुम्हाला वेळ मिळाला नसेल किंवा काही कारणानं ही साफसफाई राहिली असेल तर काळजी करू नका. ‘आज तक’ नं याबाबतच्या काही टिप्स शेअर केल्या आहेत.
घरातला कचरा- भंगार बाहेर फेकणे : घराची साफसफाई करताना घरातलं नको असलेलं सामान बाहेर फेकणं हा मुख्य भाग असतो. घरात खूप जास्त सामान ठेवणं चांगलं नाही असं वास्तुतज्ज्ञांचं म्हणणं आहे. विशेषत: ज्या गोष्टी तुटलेल्या आहेत किंवा पूर्ण रूपात नाहीत त्या घरात अजिबात ठेवू नये. घर जर अव्यवस्थित असेल तर घरात सकारात्मक उर्जा कमी निर्माण होते. त्यामुळेच दिवाळीच्या आधी घरातून भंगार सामान, इलेक्ट्रॉनिक्सच्या तुटलेल्या वस्तू, तुटकी-फुटकी क्रोकरी किंवा गेल्या सहा महिन्यांपासून तुम्ही ज्या वस्तूंचा अजिबात वापर केलेला नाही त्या सगळ्या आधी फेकून द्या. घरात तुटलेली काच किंवा काचेची वस्तू ठेवणं अपशकुन मानला जातो. त्यामुळे अशी वस्तूही घराच्या बाहेर फेका. सुखी घरासाठी पहिली पायरी म्हणजे घर स्वच्छ ठेवा. दिवाळीच्या आधी संपूर्ण घराची साफसफाई करा. घराच्या अगदी कानाकोपऱ्यांतून स्वच्छता केल्यामुळे घरातून नकारात्मक उर्जा बाहेर जाते. त्यामुळेच दिवाळीमध्ये घरातील किचन असो किंवा अगदी स्टोअर रुम, प्रत्येक कोपऱ्याची नीट स्वच्छता करा.
घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा- सकारात्मक उर्जेचा प्रवेश तुमच्या घराच्या दारातूनच होतो असं वास्तुतज्ज्ञांचं म्हणणं आहे. लक्ष्ममीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ (CLEAN MAIN DOOR) रांगोळीनी लक्ष्मीची पावलं काढली जातात. पण त्याआधी लक्ष्मीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ आणि नीटनेटकं असणं आवश्यक आहे. दिवाळीमध्ये विशेषत: लक्ष्मीपूजनाला घरातला कोणताही कोपरा अंधारात राहू नये असं म्हटलं जातं.
हे ही वाचा-दिवाळीत लक्ष्मी पूजनासोबत भगवान विष्णूची पूजा का करायची नसते?
मिठाचं पाणी शिंपडणं - एका स्प्रेच्या बाटलीत थोडसं मीठ आणि पाणी (SPRINKLE SALTED WATER) घालून संपूर्ण घरात शिंपडा. मीठ सर्व नकारात्मक उर्जा शोषून घेतं आणि वातावरण शुद्ध करतं असं म्हणतात. त्यामुळे विशेषत: दिवाळीच्या दिवसांत घरांतल्या सर्व कोपऱ्यांमध्ये असं पाणी शिंपडणं अधिक चांगलं असतं असं म्हटलं जातं.
दिशांबाबत हे लक्षात ठेवा - वास्तुशास्त्रात दिशांचं महत्त्व अधिक आहे. घराच्या उत्तर आणि ईशान्य दिशेकडील कोपऱ्याची अगदी आवर्जून स्वच्छता करा. इथं अव्यवस्थित ठेवलेलं सगळं सामान काढून टाका. असं केल्यानं घरात सुख-समृद्धी येते. घराच्या परिसरात थोडीशी हिरवळ असेल तर त्यानेही सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळेच घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला लावलेल्या छोटीशी झुडपं लावण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. घरातल्या सुख समृद्धी संपत्तीसाठी घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवण्याचा प्रयत्न करा.
रोषणाई - दिवाळी म्हणजे घरात रोषणाई हवीच. पण असं करताना वास्तुशास्त्रानुसार दिशांबाबत नक्की विचार करा. बाजारात विविध प्रकारचे अनेक रंगीत लाईट्सच्या माळा, दिवे मिळतात. घरात हे दिवे लावताना उत्तर दिशेला निळ्या, पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे दिवे लावा तर पूर्व दिशेला लाल, पिवळ्या आणि नारंगी रंगांच्या दिव्यांनी उजळून टाका. तर पश्चिम दिशेला पिवळा, नारंगी आणि गुलाबी लाईट लावा.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण...तसंच दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशानं मात करण्याचा सण. त्यामुळे सगळीकडे रोषणाई असेल तेव्हा तुम्ही तुमचं घरही स्वच्छतेनं आणि नंतर विविधरंगी दिव्यांनी उजळून टाका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali, Diwali 2021