मुंबई, 8 मार्च : हल्ली पालक आणि मुलांमध्ये संपत्तीच्या कारणावरून वाद होण्याच्या अनेक घटना आपल्याला ऐकायला येतात. बऱ्याच घटनांमध्ये मुलं फक्त पालकांच्या पश्चात संपत्ती मिळावी म्हणून त्यांचा सांभाळ करतात, नंतर मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये घडला आहे. या घटनेत मुलाच्या छळाला कंटाळलेल्या 80 वर्षीय वृद्धाने त्याची सर्व संपत्ती राज्यपालांच्या नावे केली आहे. इतकंच नव्हे तर आपल्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारातही मुलाला सहभागी होऊ देऊ नये, असं या पित्याने म्हटलं आहे. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय.
काय आहे प्रकरण?
मुझफ्फरनगरच्या बुढाना तालुक्यामधील बिराल गावात राहणारे 80 वर्षीय नत्थू सिंह यांचं मोठं कुटुंब आहे. त्यांच्या पत्नीचे 20 वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन झालं. त्यांनी दोन मुलं व चार मुलींची लग्नं स्वतः केली होती. त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा सहारनपूरमध्ये सरकारी शिक्षक आहे. गेल्या 5 महिन्यांपासून नत्थू सिंह यांना वृद्धाश्रमात राहावं लागतंय. त्यांना नीट जेवणही मिळत नाही.
'माझ्या नवऱ्याचं कोणाशी अफेअर आहे का?', महिलेच्या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं हटके उत्तर
मुलगा आणि सुनेच्या वागण्याने दुखावलेल्या नत्थू सिंह यांनी स्वतः जेवण बनवून खात असल्याचं सांगितलं. आता त्यांनी कोट्यवधी रुपयांची 18 बिघे जमीन राज्याच्या राज्यपालांच्या नावे केली आहे. त्यांनी आपल्या मुलाला संपत्तीतून बेदखल केल्याचं सांगितलं. माझ्यावर गोळ्या झाडल्या तरीही माझ्या जमिनीतील एक तुकडाही मुलाला देणार नाही, असं आपण कोर्टात म्हटल्याचं नत्थू सिंह म्हणाले.
80 वर्षीय नत्थू सिंह यांनी सांगितले की, पोटच्या मुलाला संपत्तीतून बेदखल केल्यानंतर त्यांनी संपूर्ण जमीन राज्यपालांच्या नावे केली आहे. आपण समाजासमोर उदाहरण निर्माण करण्यासाठी हे केल्याचं ते म्हणाले. तसंच माझ्या मुलाइतका नालायक मुलगा कुणाचाच नसेल, असंही ते म्हणाले. मुलाला संपत्तीतून बेदखल करून त्यांनी एक आदर्श उदाहरण घालून दिलंय. जेणेकरुन इतरांच्या मुलांनाही आपल्याबरोबर असं घडू शकतं, याचा धडा मिळावा.
लग्नासंबंधीत विचित्र परंपरांबद्दल ऐकून विश्वास बसणार नाही
आपल्याला जीवे मारण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. खोलीत कोंडून गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी मुलगा व सुनेवर केला आहे. त्यांनी आपल्या सुनेला मुलीप्रमाणे वागवलं, पण तिनेही चांगली वागणूक दिली नाही, त्या दोघांच्या तावडीतून आपण जीव वाचवल्याचं नत्थू सिंह यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Property issue, Uttar pardesh