मुंबई, 10 जून : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा लावून धरला आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरेंनी अयोध्यचा दौरा केला होता. आता पुन्हा एकदा ते अयोध्येला जाणार आहेत.
उद्धव ठाकरेंचा हा अयोध्या दौरा 16 जूनला होणार आहे. अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते महंत नृत्य गोपालदास यांच्या जन्मोत्सवातही सहभागी होतील.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याची ट्विटरवरून माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीआधीही दौरा
याआधी उद्धव ठाकरेंनी 25 नोव्हेंबर 2018 रोजी अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं. उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारकडे मागणी लावून धरली होती. रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकेरंनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला होता.संतांच्या आशिर्वादाशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही, असं ते उद्धव ठाकरे म्हणाले. भारतच नाही तर परदेशातले हिंदूधर्मीय राम मंदिराची वाट पाहत आहेत. त्यामुळे राम मंदिर झालंच पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.
अमित शहांना दिला प्रस्ताव
राम जन्मभूमी न्यासचे वरिष्ठ सदस्य आणि माजी खासदार डॉक्टर रामविलास दास वेदांची यांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे. भाजपचे नेते अमित शहा यांनी आपल्या नव्या खासदारांना घेऊन अयोध्येला यावं आणि रामलल्लांचं दर्शन घ्यावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.