आनिस शेख, प्रतिनिधी मावळ, 15 मार्च: पिंपरी चिंचवड येथील दोन मित्र काल दुपारी मावळा परिसरात पर्यटनासाठी गेले होते. पण त्यांची ही पर्यटन फेरी अखेरची ठरली आहे. हे दोघं मित्र मावळातील सांगवडे गावातून वाहणाऱ्या पवना नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले असता दोघांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी घडली आहे. तर वैभव ओव्हाळ आणि बाबुराव भुसे अशी या दोन मृत युवकांची नावं असून ते दोघंही 23 वर्षाचे होते. याप्रकरणी पोलिसांनी ओळख पटवली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असणारे वैभव ओव्हाळ आणि बाबुराव भुसे पर्यटनाच्या निमित्ताने काल दुपारी मावळातील सांगवडे गावात गेले होते. सायंकाळी हे दोघंही सांगवडे गावातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पात्रात पोहण्यांसाठी पाण्यात उतरले. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न बांधता आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यानंतर गावातील ग्रामस्थ हिरामन आगळे यांनी त्वरित याबाबतची माहिती शिरगाव पोलीसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचा शोध घेतला. पंरतु दिवस मावळल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं. यानंतर शिरगाव पोलिसांनी या घटनेची माहिती NDRF च्या पथकाला दिली. त्यानंतर आज सकाळी NDRF च्या जवांनानी नदी पात्रात शोध मोहीम सुरु केली. तेव्हा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वैभव ओव्हाळचा मृतदेह सापडला. तर कालांतराने बाबुराव भुसे याचा मृतदेहही झाडात अडकलेल्या अवस्थेत सापडला. NDRF च्या जवानांनी दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले आणि नातेवाईकांकडून दोघांचीही ओळख पटवल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात पाठवले. हे ही वाचा- माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा, सुसाईड नोट लिहित युवकानं झाडली स्वतःवर गोळी या घटनेची माहिती देताना, पोलीस निरीक्षक सुनील पिंजन यांनी सांगितलं की, गंहुजे आणि सांगवडे या दोन गावाला जोडणाऱ्या पवना नदीवरील दगडी पुलाची अवस्था पुर्णपणे जीर्ण झाली आहे. याठिकाणाहून सहजपणे नदी पात्रात उतरता येते. त्यामुळे मागील काही वर्षातील विविध दुर्घटनेत पर्यटनासाठी आलेल्या जवळपास वीस पर्यटकांचा पवना नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे पर्यटकांनी स्वतः ची सुरक्षित घेवून पर्यटन करावं. तसेच धोकादायक ठिकाणी जावून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असं आवाहनही पोलीस निरीक्षक सुनील पिंजन यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.