दिल्ली हिंसाचारात 34 जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 6 वायरलेस मॅसेजकडे दुर्लक्ष

दिल्ली हिंसाचारात 34 जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 6 वायरलेस मॅसेजकडे दुर्लक्ष

स्पेशल ब्रांचने दिल्ली पोलिसांना दंगलीबाबत संकेत दिले होते. पण...

  • Share this:

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : दिल्ली हिंसाचाराबाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना दिल्लीत धुमसणाऱ्या दंगलीविषयी 6 वायरलेस संदेश मिळाले होते. मात्र हे संदेश मिळाल्यानंतरही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. या प्रकरणात कॉग्रेसच्या सोनिया गांधी आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. दिल्ली हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

रविवारी हिंसाचाराबाबत दिल्ली पोलिसांना 6 अलर्ट मिळाले होते. यामध्ये दिल्लीत हिंसाचार घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार योग्य ती तयारी करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र पोलीस वेळेत कारवाई करु शकले नसल्याचे वृत्त आहे. स्पेशल ब्रांच आणि Intelligence Wing यांनी वायरलेस रेडिओ मॅसेजच्या माध्यमातून दंगलीचे अलर्ट पाठविले होते. भाजपचे कपिल मिश्रा यांनी उत्तर पूर्व दिल्लीत CAA ला पाठिंबा देण्यासाठी मौजपूर चौक येथे जमण्याचे आवाहन केलं होते. साधारण दुपारी 1.22 वाजता मिश्रा यांनी ट्विट करुन कार्यकर्त्यांना दुपारी 3 वाजता मौजपूर चौक येथे जमण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार Intelligence Wing ने लोकल पोलिसांना या भागातील सुरक्षा वाढविण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर या भागात दगडफेक सुरू झाली आणि लोक विविध भागांमध्ये जमू लागले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना दिलेल्या अलर्टकडे दुर्लक्ष करीत हलगर्जीपणा केला. याबाबत एका पोलिसांनी नाव न देता सांगितले की अलर्ट मिळाल्यानंतर पोलिसांकडून नियंत्रण आणण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात आले होते.

रविवारी मिश्रा जाफराबाद येथे पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांसमोर दिलेल्या भाषणात म्हणाले, 'दिल्ली पोलिसांना तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येत आहे. त्यांना जाफराबाद आणि चंद बगचे रस्ते रिकामे करावेत. यानंतर आम्हाला समजावू नका. आम्ही तुमचं देखील ऐकणार नाही. फक्त तीन दिवस'. यानंतर मिश्रा यांनी 5.11 मिनिटांनी पुन्हा ट्विट केले. मिश्रा यांनी सांगितल्यानुसार CAA विरोधात आंदोलन करणाऱ्यांनी चांद बागचा रस्ता अडवला होता. त्यांनी दोन मुख्य रस्ते अडवले होते. त्यामुळे तब्बल 35 लाख नागरिकांना प्रवास करण्यात अडथळा येत होता. शिवाय मुलांना शाळेत जाता येत नसल्याचे ते म्हणाले.

दिल्ली हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं असून आतापर्यंत 106 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.दिल्लीत दंगल भडकवल्याप्रकरणी 18 FIR दाखल करण्यात आले आहेत. या हिंसाचारात 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींवर दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आलं आहे.

First published: February 27, 2020, 9:47 AM IST

ताज्या बातम्या