चाईबासा, 30 जानेवारी: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लावण्याचं अमानवी कृत्य एका माथेफिरू मुलानं केलं आहे. त्याने निर्दयीपणाच्या सर्व परिसीमा ओलांडत आपल्या जन्मदात्या आईची काठीने बदडून हत्या केली. हा माथेफिरू एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आईचा मृतदेह घराच्या अंगणात जाळला आहे. मृतदेहाच्या आगीवर कोंबडी भाजून खाल्ली आहे.
या धक्कादायक प्रकरणानंतर आरोपी मुलाला ग्रामस्थानी पकडून त्याचे हातपाय बांधून रात्रभर पकडून ठेवलं होतं. त्यानंतर शनिवारी सकाळी पोलीस गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी माथेफिरूला पोलिसांच्या हवाली केलं. शुक्रवारी रात्री हा माथेफिरू मुलगा दारू पित बसला होता. त्यावेळी 60 वर्षांच्या आईने त्याला दारू पिण्यास मनाई केली, त्यामुळे संतापलेल्या पोराने आपल्या म्हाताऱ्या आईची काठीने बदडून हत्या केली. त्यानंतर त्याने आईचा मृतदेह घराच्या अंगणात जाळून त्याच्यावर कोंबडी भाजून खाल्ली आहे. ही धक्कादायक घटना झारखंडच्या पश्चिमी सिंहभूम जिल्ह्यातील आहे.
4 वर्षांपूर्वी वडीलांची केली हत्या
गावकऱ्यांनी सांगितलं की, आरोपी पवन सोय उर्फ प्रधान सोय याने 2016 मध्ये आपल्या पित्याची हत्या केली होती. या प्रकरणात गेल्या 4 वर्षांपासून आरोपी तुरुंगात होता. पण अलीकडेच 13 जानेवारी रोजी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. त्यानंतर 16 व्या दिवशी त्याने आपल्या जन्मदात्रीचा जीव घेतला आहे. तुरुंगातून परत आल्यानंतर तो दररोज दारू पित असायचा. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून आईने त्याला दारू पिण्यापासून रोखलं होतं.
आरोपीच्या वहिनीने सांगितलं की, शुक्रवारी रात्री घरातून आरडा ओरडा केल्याचा आवाज आला होता. पण आम्हाला वाटलं की, आरोपी तरुण नेहमीप्रमाणे दारू पिऊन धिंगाणा घालत असावा.
त्यामुळे आम्ही घरातील कोणीच बाहेर आलो नाही. त्यानंतर उठल्यावर लक्षात आलं की, माथेफिरू मुलाने आईचा मृतदेह घराच्या अंगणातचं जाळला आहे. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर आरोपीच्या वहिनीने आरडाओरडा केला. त्यानंतर गावकरी मदतीला धावून आले आणि त्यांनी आरोपीला पकडून बांधून टाकलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder