Home /News /news /

अजितदादांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घड्याळ भिंतीवर लावले, सेनेचा भाजपला टोला

अजितदादांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घड्याळ भिंतीवर लावले, सेनेचा भाजपला टोला

महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळे नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. राज्यपालांची सकाळही का बिघडवता?

    मुंबई, 30 सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनीही मध्यावधी निवडणुकीची शक्यता बोलून दाखवली. त्यामुळे 'अजित पवार यांनी आता गजराचे घड्याळ बदलले आहे', असं सांगत  शिवसेनेनं भाजपला टोला लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये 'वन फाइन मॉर्निंग… दादा, दचकू नका!' या शिषर्काखाली अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अग्रलेखातून  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगलेच टोले लगावण्यात आले आहे. पहाटे पहाटे झालेल्या शपथविधीची आठवण करून देत शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. 'आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे. असा आध्यात्मिक विचारही दादांनी पहाटेनंतरच्या सूर्योदयास मांडला आहे. म्हणजे या मंडळींच्या डोक्यात काहीतरी वळवळते आहे.  मध्यावधी निवडणुकांची भाकिते करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर ‘घडाळय़ा’चे काटे गतिमान आहेत आणि यावेळी वेळा चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. सोबतीला हात आहे. हातावर घड्याळ आहे व घडय़ाळातून पहाटेचा गजर काढून टाकला आहे. अजितदादांनी आता गजराचे नाही तर टोल्यांचे घड्याळ भिंतीवर लावले आहे व ते टोले सतत वाजत असतात. त्यामुळे सगळेच ‘जागते रहो’च्या भूमिकेत आहेत. टोल्यांच्या आवाजामुळे भाजपच्या दादांची पहाट खराब होत असेल तर तो त्यांचा प्रश्न', असा टोला सेनेनं चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. तसंच, 'फाइन मॉर्निंगला म्हणजे भल्या पहाटे काहीतरी घडेल असे चंद्रकांतदादांना का वाटते ते तपासून घ्यायला हवे. दादांची तब्येत वगैरे बरी आहे ना? त्यांना नीट झोप वगैरे लागते ना? की राजभवनातून अचानक एखाद्या फाइन मॉर्निंगला बोलावणे येईल म्हणून ते झोपतच नाहीत, चंद्रकांतदादांना फाइन मॉर्निंगला काहीतरी घडेल असे वाटते. हे काही चांगल्या प्रकृतीचे ‘साइन’ नाही', असा चिमटाही काढण्यात आला. 'देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांच्या अचानक भेटीनंतर जो गदारोळ झाला त्यामुळे एखाद्या फाइन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवता येईल असे कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. एकतर अशा फाइन मॉर्निंगचा अचानक प्रयोग भाजपने याआधी केलाच आहे, पण त्या फाइन मॉर्निंगला जे घडले ते पुढच्या 72 तासांत दुरुस्त झाले. याचे भान सध्या फक्त देवेंद्रबाबूंनाच आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची घाई नाही व हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत व त्याचवेळी एखाद्या फाइन मॉर्निंगला ‘काहीतरी’ घडेल असा मंतरलेला संदेश चंद्रकांत पाटील देत आहेत. लोकांनी आता काय समजायचे?' असा थेट सवालही सेनेनं पाटलांना विचारला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या