Home /News /news /

संजय राऊतांचा दावा ठरला खोटा, सुशांतच्या मामाने केला मोठा खुलासा

संजय राऊतांचा दावा ठरला खोटा, सुशांतच्या मामाने केला मोठा खुलासा

संजय राऊत यांनी रोखठोक सदरात भाजप, बिहार पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर काही प्रश्न उपस्थितीत होते.

    मुंबई, 10 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राजकीय वाद उफाळला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या बेछुट आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणात उडी घेत सुशांतच्या वडिलांबद्दल गंभीर आरोप केला होता. पण, सुशांतच्या मामाने राऊतांचा दावा खोडून काढला आहे. संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरामध्ये सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केला होता. त्यांच्या या आरोपावर सुशांतचे मामा आर.सी.सिंग यांनी खुलासा केला आहे. 'खासदार संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबीयावर चुकीचे आरोप केले आहे. त्यांचे हे वक्तव्य प्रतिमा मलिन करणार आहे. कोणतीही माहिती न घेता उगाच आरोप करून एखाद्याच्या प्रतिमेवर बोट ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?' असा सवाल सिंग यांनी थेट राऊतांना विचारला. तसंच, सुशांत आणि त्याच्या वडिलांमध्ये पटत नसले तरीही त्याच्या वडिलांनी कोणतेही दुसरे लग्न केले नाही. हे बिहारमध्ये राहत असणाऱ्या सर्व लोकांना माहिती आहे, असा खुलासाही सिंग यांनी केला. संजय राऊत यांनी रविवारी  शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात भाजप, बिहार पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर काही प्रश्न उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी, 'सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते.  सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे' असं वक्तव्य राऊत यांनी केले होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या