नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : निसर्गाचे अनेक चमत्कार मानवाला थक्क करतात. जगभरात प्राणी, पक्षी, वनस्पती अगदी माणसांमध्येही अनेक अजब गोष्टी पहायला मिळतात. सध्या सर्वत्र एका अजब गायीची चर्चा सुरू आहे. कारण या गायीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Record) नोंदलं गेलं आहे. मात्र दुर्दैवाची बाब अशी आहे की या गायीच्या मृत्यूनंतर एका महिन्यानं तिच्या नावावर हा विक्रम नोंदला गेला आहे. जगातील सर्वांत कमी उंचीची गाय (Dwarf Cow) ठरण्याचा विक्रम नोंदवणारी ही गाय सोशल मीडियावर अतिशय प्रसिद्ध झाली होती.
बांगलादेशची (Bangladesh) राजधानी ढाका (Dhaka) इथल्या काझी मोहम्मद अबू सुफियान यांच्या मालकीची राणी नावाची ही गाय अवघ्या 20 इंच उंचीची (20 Inch Cow Rani) होती. दोन वर्षांची ही गाय तिच्या इतक्या कमी उंचीमुळे जगभरात सर्वांत बुटकी गाय म्हणून प्रसिद्ध झाली होती. तिची ख्याती ऐकून जगभरातून अनेक लोक तिला बघायला येत असत. लॉकडाउननंतरही, लोक तिला पाहण्यासाठी दूरून येत असत. वाढत्या गर्दीमुळे तिच्या सुरक्षेसाठी तीन रक्षक तैनात करण्यात आले होते. तिच्या मृत्यूच्या तीन दिवस आधीपर्यंत जवळपास 15 हजार लोक तिला बघायला आले होते, अशी माहिती काझी मोहम्मद अबू सुफियान यांनी दिली.
उड उड रे COW : आकाशात उडाल्या 10 गायी, पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का
तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Record) नोंदवलं जावं यासाठी काझी मोहम्मद अबू सुफियान यांनी प्रयत्न सुरू केले होते. जगातील सर्वात बुटक्या गायीचा विक्रम भारतातील 24 इंच उंचीच्या माणिक्यम नावाच्या एका गायीच्या नावावर होता. राणीची उंची मोजली असता ती केवळ 20 इंच होती. त्यामुळं आता जगातील सर्वांत बुटकी गाय म्हणून तिचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदलं गेलं आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नुकतीच काझी मोहम्मद अबू सुफियान यांना पत्र पाठवून याची अधिकृत माहिती दिली. गिनीज बुकच्या वेबसाइटवरही याची माहिती देण्यात आली आहे; पण हे होण्यापूर्वी एक महिनाभर 19 ऑगस्ट रोजी राणीचा मृत्यू झाला.
पोटात गॅस झाल्यानं तिचा अचानक मृत्यू झाल्याचं काझी मोहम्मद अबू सुफियान यांनी सांगितलं. आपल्या गायीच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला गेल्यानं आपल्याला खूप आनंद झाला पण राणी आता आपल्यासोबत नाही, याचं अतिशय दुःख असल्याचंही काझी मोहम्मद अबू सुफियान यांनी म्हटलं आहे.
गिनीज बुकमध्ये नाव नोंदलं गेल्यानं राणी तिच्या मृत्यूनंतरही (Death) पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मृत्यूनंतर एखाद्या प्राण्याच्या नावावर जागतिक विक्रम नोंदवला जाण्याची आणि अशी लोकप्रियता मिळण्याची बाबही तशी विशेषच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: World record