मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दहशतवादाविरोधात '28 सप्टेंबर'चं कनेक्शन; PFI वरील बंदीचा निर्णय सर्जिकल स्ट्राइकच्याच दिवशी

दहशतवादाविरोधात '28 सप्टेंबर'चं कनेक्शन; PFI वरील बंदीचा निर्णय सर्जिकल स्ट्राइकच्याच दिवशी

फाईल फोटो

फाईल फोटो

योगायोगाने 2016मध्ये याच दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केला होता; मात्र त्याबद्दलची घोषणा एका दिवसानंतर म्हणजेच 29 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आली होती

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 28 सप्टेंबर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना तसंच या संघटनेशी संलग्न किंवा निगडित असलेल्या सर्व संघटनांवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्रीय यंत्रणांकडून या संघटनेच्या मालमत्तांवर नुकत्याच टाकण्यात आलेल्या धाडींनंतर बुधवारी पहाटे (28 सप्टेंबर 2022) हा निर्णय जाहीर करण्यात आला. UAPA कायद्यानुसार ही संघटना बेकायदा असल्याचंही केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. देशांतर्गत वाढलेल्या दहशतवादाविरोधात उचललेलं हे खूप मोठं पाऊल असल्याचं भाजप नेते सी. टी. रवी यांनी म्हटलं आहे.

योगायोगाने 2016मध्ये याच दिवशी म्हणजे 28 सप्टेंबरला भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केला होता; मात्र त्याबद्दलची घोषणा एका दिवसानंतर म्हणजेच 29 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आली होती. तसंच, 29 सप्टेंबर हा सर्जिकल स्ट्राइक दिवस म्हणून साजरा करण्याचंही घोषित करण्यात आलं होतं.

सर्जिकल स्ट्राइक दिवस, तसंच पीएफआयवर केंद्राने नुकतीच केलेली कारवाई या अनुषंगाने घेतलेला हा आढावा...

मोठी बातमी! केंद्राने PFI सह या संघटनांना बेकायदेशीर घोषित करत घातली बंदी

उरी हल्ल्याला प्रत्युत्तर

पाकव्याप्त काश्मिरातल्या दहशतवाद्यांच्या छावण्यांवर भारतीय लष्कराने सप्टेंबर 2016मध्ये सर्जिकल स्ट्राइक केला. 18 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या काश्मीरमधल्या उरी इथल्या तळावर हल्ला केला होता. त्यात 20 जवान हुतात्मा झाले. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने 28 सप्टेंबर रोजी हा सर्जिकल स्ट्राइक केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या सर्जिकल स्ट्राइकबद्दलची माहिती तपशीलाने दिली. जवानांची सुरक्षितता लक्षात घेऊन या सर्जिकल स्ट्राइकची तारीख दोन वेळा बदलण्यात आली होती, असं त्यांनी सांगितलं.

'उरीच्या दहशतवादी हल्ल्यात जवान मारले गेल्यानंतर लष्करात, तसंच माझ्या मनात दहशतवाद्यांविरुद्ध प्रचंड क्षोभ निर्माण झाला होता. त्यामुळे या सर्जिकल स्ट्राइकचं नियोजन करण्यात आलं. मी जवानांच्या तुकड्यांना असं सांगितलं होतं, की यशापयशाची चिंता करू नका आणि सूर्योदयापूर्वी परत या,' असं मोदींनी त्या मुलाखतीत सांगितलं होतं.

PFI प्रकरणातील मोठी अपडेट; एकाच पत्त्यावरुन सर्वाधिक जणांना अटक

पाकिस्तानमधल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी उरीच्या तळावर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराच्या तुकड्या, तसंच जम्मू-काश्मीरमधली विशेष दलं आणि निमलष्करी दलांच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अनेक ठिकाणी सर्जिकल स्ट्राइक केला. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी, तसंच लष्कर आणि नागरिकांवर हल्ले करण्यासाठी या ठिकाणांवरून दहशतवादी येत असत.

'हुतात्मा जवानांना न्याय द्यायचा होता'

'लष्कराशी बोलताना मला जाणवलं, की त्यांना हुतात्मा जवानांना न्याय मिळवून देण्याची तीव्र इच्छा आहे. सरकारने त्यांना सर्जिकल स्ट्राइक्सचं नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं,' असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

'आम्ही आमच्या बाजूला आलेल्या दहशतवाद्यांना तर मारू शकतोच; पण गरज पडली, तर सीमापार जाऊनही दहशतवाद्यांना कंठस्नान घालू शकतो, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून जगाला गेला आहे,' अशी भावना तत्कालीन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली होती. या सर्जिकल स्ट्राइक्सबद्दल सर्वसामान्य जनता आणि लष्करी दलांकडूनही जल्लोष करण्यात आला होता.

'पीएफआय'वर बंदी

22 सप्टेंबर 2022 रोजी एनआयएसह अन्य केंद्रीय यंत्रणांनी मिळून पीएफआय ही संघटना तसंच या संघटनेशी निगडित देशभरातल्या अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. ही संघटना मूलतत्त्ववादी इस्लामिक असल्याचे आरोप अनेकदा झाले होते, तसे काही पुरावे सापडले होते. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर पाच दिवसांनी मंगळवारी (27 सप्टेंबर) सात राज्यांमध्ये धाडी टाकून पीएफआयशी संबंधित 170 जणांना ताब्यात घेण्यात आलं किंवा अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, आसाम आणि मध्य प्रदेश या सात राज्यांच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

22 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या नेतृत्वाखाली अनेक यंत्रणांनी एकत्रितरीत्या केलेल्या कारवाईत 15 राज्यांमध्ये धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यात पीएफआयच्या 106 जणांना अटक करण्यात आली होती. देशात दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्याचा आरोप त्यांच्यावर होता. पीएफआयशी संबंधित 19 प्रकरणांचा तपास एनआयए करत आहे.

मंगळवारी, 27 सप्टेंबर रोजी केलेली कारवाई त्या त्या राज्यांच्या पोलिसांनी केली होती; मात्र ती उत्तम समन्वयामुळे एकाच वेळी करण्यात आली. आसाम आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 25 जणांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशात 57 जणांना ताब्यात घेण्यात आलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दिल्लीत 30, मध्य प्रदेशात 21, गुजरातमध्ये 10, तर महाराष्ट्रात पुण्यात 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं. कर्नाटकातही अनेकांना अटक करण्यात आली. ही दहशतवादाविरोधात केलेली उत्तम कारवाई असल्याचं सांगून भाजप नेत्यांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे.

First published:

Tags: Surgicalstrike2, Terrorist attack