मुंबई, 16 मे : मान्सूनपूर्वच्या वादळी वाऱ्यात अंगावर पत्रे पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर 7 घरांच्या छपरावरील कौलं, पत्रा उडाल्यानं अनातोन नुकसान झालं आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सातही कुटुंब उघड्यावर पडली आहेत. ही घटना भिवंडी तालुक्यातील किरवली (आमणे) गावात शुक्रवारी रात्री घडली आहे. राज्यावर आधीच कोरोनाचं संकट आहे. त्यात अशा प्रकारे अवकाळी पावसानं दगा दिल्यामुळे नागरिकांवर मोठं संकट ओढावलं आहे.
कैलाश गोविंद बजागे (वय 35) असं मान्सूनपूर्वच्या वादळी वाऱ्यात पहिला बळी ठरलेल्या तरुणाचं नाव आहे. ठाणे जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात गेल्या चार दिवसापासून मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातला आहे. शिवाय यासोबतच वादळी वाऱ्यानं जिल्ह्यातील अनेक घरांचं नुकसान झालं आहे. या नुकसानीच्या भरपाईची मागणी होत असतानाच काल रात्री 8 वाजेच्या सुमाराला तालुक्यातील किरवली (आमणे) गावात अचानक मान्सूनपूर्व वादळी वाऱ्याचा तडाका बसला होता.
या राज्यांमध्ये येणार Amphan चक्रीवादळ, ताशी 190 किमी वेगाने वाहतायत वारे
वादळी वारा एवढा जोरात होता कि घरांचे पत्रे 40 ते 50 फूट उंच हवेत उडाले. यातच काही अंतरावर उभ्या असलेल्या गावातील तरुण कैलाश गोविंद बजागे याच्या अंगावर लोखंडी पत्रे पडून गंभीर जखमी झाला होता. त्याला गावकऱ्यांनी तातडीनं उपचारासाठी कल्याणातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारादरम्यान कैलाशचा मृत्यू झाला आहे.
राखी बांधून घेणारा भाऊच ठरला नराधम, महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना
मृतक हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरर्निवाह करीत होता. त्याच्या पश्च्यात वयोवृद्ध आई, पत्नी आणि 2 मुलं असा परिवार असून हे कुटुंब पोरकं झालं आहे. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे गावातील घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं 7 कुटुंब उघड्यावर आली आहेत. तर 2 दुचाक्या आणि 1 चारचाकी वाहनांचं नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदकर सजेचे तलाठी अविनाश राऊत यांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन नुकसानग्रस्त घरांचं पंचनामे केले आहेत.
यामध्ये लाखोंचं नुकसान झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त गावकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाईची मागणी भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे केली आहे.
लाऊडस्पीकरवरुन अजान देणं हा इस्लाम धर्माचा भाग नाही - अलाहाबाद उच्च न्यायालय
संपादन - रेणुका धायबर