भोपाळ : लघुशंका करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चढणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं आहे. त्याला सहा हजार रुपये भुर्दंड आणि त्रास सहन करावा लागला. भोपाळ रेल्वे स्थानकावरून एका प्रवाशाला सिंगरौलीला जायचं होतं. तो हैदराबादहून भोपाळ रेल्वे स्थानकावर उतरला होता. त्यावेळी इंदूरला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस आली आणि तो उभा होता त्या प्लॅटफॉर्मवर थांबली. प्रवाशाला लघुशंका करायला जायचं होतं तर तो वंदे भारत एक्सप्रेसच्या बोगीत घुसला. तो टॉयलेटच्या दिशेने गेल्यावर कोच लॉक झाला. लघवी करून तो बाहेर आला तेव्हा ट्रेन सुटली होती. अब्दुल कादिर असं या प्रवाशाचं नाव आहे. ही घटना 15 जुलैची आहे. कादिर (32 ) हा सिंगरौली जिल्ह्यातील बैढनचा रहिवासी आहे. हैदराबादमध्ये त्याचं ड्रायफ्रूटचं दुकान आहे. सिंगरौलीला जाण्यासाठी तो 15 जुलै रोजी भोपाळ रेल्वे स्थानकावर उतरला. तो सकाळी 7.24 वाजता वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चढला आणि 7.25 वाजता ट्रेन सुटली. टॉयलेटमधून बाहेर आल्यावर ट्रेन सुटली होती. त्याचे कुटुंबीय स्टेशनवरच राहिले. शिवाय ही ट्रेन भोपाळहून सुटल्यानंतर मध्ये कुठेही थांबत नाही. दरम्यान, कादिरने दोन चुका केल्या होत्या, एक तर तो विना तिकीट ट्रेनमध्ये चढला होता. आणि दुसरी म्हणजे थांबलेल्या ट्रेनमध्ये टॉयलेट वापरणं बेकायदेशीर आहे, ते त्याने केलं होतं.
ट्रेनमध्ये तो मदतीसाठी टीटीई आणि पोलिसांकडे गेला. सर्वांनी सांगितलं की फक्त ड्रायव्हर ट्रेनचा दरवाजा उघडू शकतो. यानंतर त्याला ड्रायव्हरकडे जाण्यापासून रोखण्यात आलं. टीटीईने त्याच्याकडून 1020 रुपये दंड घेतला. यानंतर भोपाळपासून 174 किमी दूर उज्जैनला गेल्यावर ट्रेन थांबली आणि तो खाली उतरला. त्यानंतर तिथून परतण्यासाठी त्याला 750 रुपये बस भाडं भरावं लागलं. तसंच सिंगरौलीला जाण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचं तिकीटही त्याला रद्द करावं लागलं. त्याला लघवीसाठी उभ्या ट्रेनमध्ये चढणं चांगलंच महागात पडलं. त्याला एकूण 6 हजार रुपयांचा भुर्दंड बसला. कादिर त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांची तिकिटं दक्षिण एक्सप्रेसच्या सेकंड एसीमध्ये होती. ट्रेन चुकल्यामुळे त्यांना सहा हजार रुपये भरावे लागले, तसेच त्रासही झाला. दरम्यान भोपाळ रेल्वे विभागाच्या प्रवक्त्यांनी वंदे भारतमध्ये विना तिकीट चढणं बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये लघवीही करता येत नाही. ते नियमांच्या विरोधात आहे, असंही सांगितलं आहे.