मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पतंग उडवताना 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; रात्रभर शोध घेतला अन् शेवटी...

पतंग उडवताना 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; रात्रभर शोध घेतला अन् शेवटी...

या घटनेनंतर कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

या घटनेनंतर कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

या घटनेनंतर कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Washim, India

किशोर गोमाशे/ वाशिम, 3 नोव्हेंबर : कारंजा शहरातील अय्यान शेख या 9 वर्षीय मुलाचा पतंग उडवत असताना कडा नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलगा घराबाहेर खेळण्यासाठी गेला तो परतलाच नाही. अय्यान शेखचा मृतदेह आज सकाळी विहिरी बाहेर काढण्यात आला असून दोषी असलेल्या ले आउट धारकावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.

कारंजा शहरातील अल कबीरनगर जवळच्या ले आउटमध्ये उघडी विहीर आहे. ही विहीर जमिनीलगत असून याला उंच कडा बांधलेल्या नाहीत. या ले आउटमध्ये लहान मुले नियमित खेळत असतात. बुधवारी सकाळी अय्यान शेख व त्याचा एक मित्र या परिसरात पतंग उडवित असतांना भुई सपाट असलेल्या या विहिरीत अय्यान शेख पडला. याची माहिती त्याच्या मित्राने कुटुंबियांना दिली असता विहिरीत अय्यानचा शोध सुरू केला.

मात्र विहिरीला जास्त पाणी असल्याने दिवस आणि रात्रभर इरफान शेख, अब्दुल कलीम यांच्यासह अग्निशमन दल, सर्व धर्म आपत्कालीन संस्था व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्रभर शोध घेतला. अखेर आज सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास अय्यान शेखचा मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात यश आलं. केवळ ले आउट धारकाच्या हलगर्जीपणामुळं एका बालकाला नाहक आपला जीव गमवावा लागला. या विहिरीवर संरक्षण जाळी बसविण्याची मागणी अलकबीर नगरच्या नागरिकांनी अनेकदा केली. मात्र त्याकडे ले आउट धारकाने दुर्लक्ष केलं.

जर संरक्षण जाळी बसविली असती तर ही घटना टाळता आली असती असा सूर ही नागरिकांमध्ये उमटत आहे. या बालकाच्या मृत्यूस ले आऊट धारक जबाबदार असल्याचा आरोप अय्यान शेखचे वडील शाहिद शेख यांनी केला असून या प्रकरणी पुढील तपास कारंजा पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Washim