भिवंडी, 8 फेब्रुवारी : नाशिक महामार्गावर गेल्या 2 तासांपासून वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. शनिवार-रविवार अशा दोन दिवस सलग सुट्टी असल्याने मुंबईहून नाशिक येथे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. येथील एका टोल कामगाराने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. या कारणामुळे नाशिक महामार्गावरील पडघा टोल नाक्यावर तब्बल 2 तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाहतूक कोंडींमध्ये एक रुग्णवाहिका अडकली असल्याने वाहतूक लवकर खुली करा, अशी विनंती टोल कर्मचाऱ्यांना केली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब निंबाळकर यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यांच्यामध्ये झालेल्या बाचाबाचीत वाहतूक कोंडी वाढली आणि 1 किलोमीटरभर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सलग दोन दिवस सुट्टी असल्याने मुंबई परिसरातील पर्यटक शिर्डी, नाशिक करिता निघाले असताना पडघा येथील टोल नाक्यावर नियोजनाच्या अभावामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या दादागिरीमूळे वाहतूक कोंडी झाली असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.