भोपाळ, 19 फेब्रुवारी: मुख्यमंत्र्यांची डासांनी झोप उडवल्याने एका इंजीनिअरला नोकरी गमावावी लागल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. आपला दौरा आटपून रात्री शासकीय विश्रामगृहात आरामासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांचा डासांनी रात्रभर चावा घेतला आहे. त्यामुळे शासकीय इमारतीच्या असुविधा चव्हाट्यावर आल्या आहेत. सोबतच या इमारतीची निगा राखणाऱ्या इंजीनीअरला नोकरी गमवावी लागली आहे. त्याला नोकरीवरून निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणाची चर्चा सोशल मीडियात जोरात सुरू आहे. हे प्रकरण मध्यप्रदेशातील असून राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान शासकीय विश्रामगृहात आराम करताना त्यांना डासांनी रात्रभर त्रास दिला आहे. ते बुधवारी सीधी येथे झालेल्या बस अपघाताची माहिती घेण्यासाठी मृतांच्या नातेवाईंकांना भेटण्यासाठी येथे गेले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचा सर्व दौरा आटपून रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आराम करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात गेले होते. त्याठिकाणी मच्छरदाणीची सुविधा नव्हती. मुख्यमंत्री झोपण्याचा प्रयत्न करत असतानाचा त्यांना डासांनी चावायला सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या मुख्यमंत्र्याची रात्री अडीच वाजता संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडणी केली आहे. त्यानंतर त्यांच्या खोलीत औषध फवारणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री झोपू शकले. पण पहाटे चार वाजता आणखी एक प्रताप घडला ज्यामुळे शिवराजसिंह चौहान यांची झोपमोड झाली. हेही वाचा-
राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेच्या ज्येष्ठ नेत्याच्या भावाकडून 11 कोटींचं दान
पहाटे चार वाजता छतावरची पाण्याची टाकी भरून ओसंडून वाहत होती. पण याची दखल कोणीच घेतली नाही. माहिती मिळाल्यानंतर पीडब्ल्युडीच्या अधिकाऱ्यांनी मोटर बंद केली. सकाळी मुख्यमंत्री उठल्यानंतर सर्वप्रथम रीवा विभागाचे कमिश्नर राकेश कुमार यांना बोलावून या अव्यवस्थेबद्दल त्यांची कानउघडणी केली. त्यानंतर कमिश्नर साहेबांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं आहे. शिवाय सेवेवर असणाऱ्या कनिष्ठ इंजिनीअरला निलंबित केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.