मुंबई, 4 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे. या प्रकरणाशी ड्रग्ज कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रिया-शोविक आणि सॅम्युल मिरांडा समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. शोविक आणि रियाचे ड्रग्ज विषयी चॅट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स विभागानं रियाच्या घरी छापा टाकला आहे तर दुसरी एका टीमनं सॅम्युल मिरांडा याला ताब्यात घेतलं आहे. मिरांडा हा सुशांतचा हाऊस मॅनेजर आहे.
हेही वाचा...कंगनावर संतापले मराठी कलाकर, सोशल मीडियावरून केला टीकेचा भडिमार
दुसरीकडे, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौत ही सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करत आहे. तिनं नुकतंच मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीर अर्थात POK शी केली आहे. तसेच मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखवला आहे. यानंतर कंगनालर टीकेची झोड उठली असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) यात उडी घेतली आहे. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं, असं मनसेनं म्हटलं आहे.
पंगा घेऊ; नकोस, मनसेची धमकी
माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, असं म्हणत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कंगनाला सज्जड इशारा दिला आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 4, 2020
अमेय खोपकर यांनी ट्वीट करून कंगनावर निशाणा साधला आहे. 'माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो… कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही', अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी कंगणाला सुनावलं आहे.
काय आहे कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य...
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. तिनं ट्विटरवरून देखील विविध व्यक्तींवर टीका करण्याची संधी सोडली नाही आहे. दरम्यान कंगनाने नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?'
हेही वाचा...'नार्को टेस्ट या क्षणी घ्या! बालिश आरोप करण्यापेक्षा कंगना काय सांगते ते तर ऐका'
काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेना नेता संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून असे म्हटले होते, त्या मुंबईत राहतात आणि तरीदेखील इथल्या पोलिसांवर टीका करतात. त्यांनी असे म्हटले होते की, 'मी त्यांना (कंगनाला) नम्र विनंती करतो की त्यांनी मुंबईत येऊ नये. हे मुंबई पोलिसांचा अपमान करण्याव्यतिरिक्त काही नाही आहे. गृह मंत्रालयाला यावर कारवाई करायला हवी'.
कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस कमिशनर आणि मुंबई पोलिसांच्या कामकाजावर सवाल उपस्थित केले होते. तिने असा आरोप देखील केला होता की, CP मुंबई पोलिसांनी कंगनाबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्याचे ट्वीट लाइक केले आहे. कंगनाचे याबाबत मुंबई पोलिसांबरोबर ट्वीटवॉर झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते.