रत्नागिरी, 13 जानेवारी : कोरोनाचा (Coronavirus) काळ अनेकांसाठी आव्हानात्मक होता. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या काळात घर चालवणं प्रत्येकासाठी मोठं जिकरीचं होतं. मात्र अशातच घरातील महिलेसह मुलांनीही शक्य ती मदत केली. अशीच एक कहाणी आहे रत्नागिरीतील मैथिलीची. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा मैथिली नववीत होती.
यादरम्यान आई-वडिलांची होणारी ओढाताण पाहून तिनेही घराला हातभार लावण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे अख्खं जग घरात बसलं होतं. त्यात शिक्षणदेखील ऑनलाइन सुरू होतं. त्यामुळे मैथिलीने घरबसल्या मास्क तयार करण्याचा व्यवसाय सुरू केल्या. नववीतील ही मुलगी आई-बाबांच्या सोबत खंबीर उभी राहिली. आता मैथिली 11 वी सायन्सला आहे, मात्र तरीही ती तिथं काम नित्यनेमाने करीत आहे. नवी उमेदने याची दखल घेत मैथिलीचा हा प्रवास प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.
हे ही वाचा-क्या बात है! 4 दिवस करा नोकरी आणि इतर 3 दिवस असेल सुटी; 'या' MNC ची ऑफर
जाणून घ्या मैथिलीच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल...
कोरोनामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कळली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगारकपात झाली. पण मग यातून सावरण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे पर्याय शोधले. काही कुटुंबातली मुलंही पालकांच्या मदतीला सरसावली. यापैकीच एक रत्नागिरीची मैथिली.
कोरोनाचं संकट आलं तेव्हा मैथिली नववीत होती. वडील दीपक शिंगण एका प्रेसमध्ये तर आई शिवणकाम करणारी. आईबाबांची ओढाताण तिच्या लक्षात आली. तिनं कापडी मास्क तयार करायला सुरुवात केली. किंमत २० रुपये. वेगवेगळ्या डिझाईनचे तिचे मास्क चांगले विकले गेले. गरजूंना तिने मोफतही दिले. घरात एकच अँड्राईड मोबाईल होता. मैथिली आणि तिचा भाऊ समर्थ कोणतीही कटकट न करता एकमेकांना सांभाळून ऑनलाईन शिकले. मैथिली रांगोळी आणि मेहंदी उत्तम काढते. कोरोना काळात जास्त पैशांची अपेक्षा न ठेवता तिनं मेहंदीच्या ऑर्डर घेतल्या.
मैथिली सध्या ११ वी सायन्सला आहे. अभ्यासातही ती हुशार आहे. वडील दीपक शिंगण सांगतात,''मैथिलीचा आम्हाला अभिमान आहे. अभ्यास तर ती करतेच. घरकामात मदत करते. आमची ओढाताण होऊ नये म्हणून तिची खूप धडपड सुरू असते. ''मैथिली सांगते,'' आईबाबा आमच्यासाठी खूप कष्ट घेतात. त्यांना साथ देऊन मलाही समाधान मिळतं. कष्टाशिवाय फळ मिळत नाही, याची जाणीव ठेवली की कुठल्याही क्षेत्रात यश मिळतंच.''
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Ratnagiri, Small girl