मुंबई, 14 जुलै: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक नदी-नाले, धबधबे दुथडी बनून वाहत आहेत. त्यामुळे अनेक अपघातं घडल्याचं समोर आलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील गड, किल्ले, धबधबे अशा धोकादायक ठिकाणी पर्यटनास 17 जुलैपर्यंत बंदी आणली आहे. या परिसरात 17 जुलैपर्यंत कलम 144 लागू असेल. तसेच पुणे जिल्ह्यातील पाच तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमधील शाळांना 14 ते 16 जुलैपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता या महाप्रचंड पावसाबद्दल (Maharashtra Rain Updates) हवामान खात्याकडून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
अजून दोन दिवस महाराष्ट्रात मान्सून बरसणार आहे मात्र त्यानंतर संपूर्ण राज्यभरात पावसाचा जोर कमी कमी होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. अमुपम कश्यपी यांनी न्यूज18 लोकमतला दिली आहे. सध्या पुणे आणि घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेकांचं नुकसान झालं आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मात्र आता दोन दिवसांनंतर पाऊस उसंत घेणार असल्याची माहिती नक्कीच दिलासादायक आहे.
VIDEO : पावसामुळे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, रस्त्यावर जमलेल्या गर्दीचाही थरकाप उडाला
असं असलं तरी पुढेच दोन दिवस रायगड, पालघरमध्ये उद्याही रेड अलर्ट राहणार आहे अशी माहिती वेधशाळेच्या संचालकांनी दिली आहे. तसंच पूर्व विदर्भातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अजूनही पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या काही दिवसांमध्ये पुणे, मुंबईत सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 16 तारखेपासून संपूर्ण राज्यात पाऊस कमी होईल असा सांगण्यात आलं आहे. असं असेल तरी कोकण आणि सह्याद्रिच्या घाट माथ्यावर माञ पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहितीही पुणे वेधशाळेने दिली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रिच्या घाट माथ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain