चुरशीची लढाई : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची बायको देणार दिग्गजांना टक्कर

चुरशीची लढाई : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची बायको देणार दिग्गजांना टक्कर

विदर्भातल्या एका मतदारसंघाची लढत राज्यात लक्षवेधी ठरली आहे, ती समोरासमोर उभ्या ठाकलेल्या दिग्गजांमुळे नव्हे, तर पहिल्यांदाच निवडणुकीला उभ्या राहिलेल्या एका नवख्या उमेदवारामुळे.

  • Share this:

 भास्कर मेहेरे मुंबई, 4 मार्च : विदर्भातल्या एका मतदारसंघाची लढत राज्यात लक्षवेधी ठरली आहे, ती समोरासमोर उभ्या ठाकलेल्या दिग्गजांमुळे नव्हे, तर पहिल्यांदाच निवडणुकीला उभ्या राहिलेल्या एका नवख्या उमेदवारामुळे. ही महिला उमेदवार आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची बायको आणि मतदारसंघ आहे यवतमाळ- वाशिम.

वास्तविक यवतमाळ-वाशिम जागेवरून या वेळी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना उभं करण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. शिवसेनेनं विद्यमान खासदार भावना गवळी यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे युती विरुद्ध आघाडी दोन्हीचे तगडे उमेदवार रिंगणात आहे. पण राज्यात चर्चा आहे तिसऱ्या उमेदवाराची. वैशाली येडे यांच्या नावाची. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार या पक्षाकडून त्यांना तिकीट देण्यात आलं आहे.

वैशाली येडे हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं होतं यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी. नयनतारा सेहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यामुळे मोठा वाद ओढवला होता. आयत्या वेळी वैशाली येडे यांना संमेलनात भाषण करण्याची संधी मिळाली. शेतकरी पतीने आत्महत्या केल्यानंतर काय काय प्रश्नांना सामोरं जावं लागतं यापासून ते हा प्रश्न वैयक्तिक नसून सामाजिक प्रश्न कसा आहे यापर्यंत त्यांनी विवेचन केलं आणि त्यांचं भाषण गाजलं. शेतकऱ्याच्या पत्नीचं मनोगत अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारं ठरलं. तेव्हापासून वैशाली यांचं नाव महाराष्ट्रात गाजत आहे.

वैशाली यांचं नाव आणि त्यांची 'व्होट आणि नोट दोन्ही द्या' ही मोहीम ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये जास्त गाजते आहे. सोशल मीडियावर वैशाली येडे यांनी ही मोहीम सुरू केली आहे. निवडणूक लढवण्यासाठी पैसा नाही. तो निधी त्या क्राउड फंडिंगच्या माध्यमातून गोळा करत आहेत.

वैशाली येडे हे नाव या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये वेगळं म्हणून पुढे आलं आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी म्हणून वैशाली येडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी लढा उभारला.

काही दिवसात जमले दीड लाख

वैशाली येडे यांच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांना यासंदर्भात विचारलं असता त्या सांगतात, मी ज्या ठिकाणी जाते तिथे मतदार आमच्या झोळीत पैसे टाकतात. कोणी 1 रुपया तर कोणी 50 रुपयांचीही मदत करतो. मी मदतीच आवाहन केलं. त्यानंतर आतापर्यंत माझ्या खात्यात 1 लाख 30 हजार रुपये जमा झाले आहेत, असं त्या सांगतात.

निवडणूक कार्यक्रम काय?

वैशाली येडे म्हणाल्या, "मी प्रचाराला बाहेर पडते, तेव्हा मला लोकांचा प्रतिसाद उत्तम मिळतो आहे.  विशेतः महिलांचा प्रतिसाद चांगला आहे. दारूबंदी आणि पाणी हे माझ्या प्रचाराचे मोठे मुद्दे आहेत. दारूमुळे कित्येक संसार उद्धवस्त झाले. त्यामुळे दारूचा मुद्दा  आहे.  मतदार संघात पा ण्याची समस्या भीषण आहे. या दुष्काळाच्या वर्षी तर हाल होत आहेत. मी निवडून आले तर पहिल्यांदा पाण्याची समस्या सोडविणा. आमच्या  महिलांना 1-2 किमी अंतर लांबून  पाणी आणावं लागत आहे. त्यांच्यासाठी काही करायचं म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले", वैशाली सांगतात.

विदर्भातल्या प्रमुख लढती

नागपूर -  नितीन गडकरी (भाजप), नाना पटोले (काँग्रेस)

चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप),  सुरेश धानोकर (काँग्रेस)

यवतमाळ वाशिम - भावना गवळी (शिवसेना), माणिकराव ठाकरे (काँग्रेस)आणि वैशाली येडे (प्रहार)

बुलढाणा - प्रतापराव जाधव (सेना), राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस)

अमरावती - आनंद अडसूळ (सेना), नवनीत राणा (युवा स्वाभिमानी पक्ष)

भंडारा गोंदिया - सुनील मेंढे (भाजप), नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)

गडचिरोली चिमूर - अशोक नेते (भाजप), नामदेव उसेंडी (काँग्रेस)

वर्धा - रामदास तडस (भाजप), चारुलता टोकस (काँग्रेस)

रामटेक - कृपाल ताम्हाणे (सेना), किशोर गजभिये (काँग्रेस)

First published: April 4, 2019, 9:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading