जळगाव 8 जुलै: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या कारला अपघात झाला आहे. नाशिक आणि मालेगांवचा दौरा आटोपून परत येत असताना हा अपघात झाला. हा अपघात किरकोळ असून प्रवीण दरेकरांसहीत सर्व जण सुखरूप असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली. फडणवीस आणि दरेकर हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. काळजीचं काहीही कारण नाही अशी माहितीही त्यांनी दिली. फडणवीस म्हणाले, नाशिक आणि मालेगांवचा दौरा आटोपून आम्ही जळगावकडे जात असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला. स्वतः प्रवीण दरेकर आणि इतरही सर्वच जण सुरक्षित आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही.
हे दोनही नेते कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावरून परतत असताना हा अपघात झाला. त्यावेळी पाऊसही सुरू होता. दरेकर यांच्या ताफ्यातील पोलिसांचं एक वाहन त्यांच्या कारला येऊन धडकलं त्यामुळे हा अपघात झाला. फडणवीस आणि दरेकर हे दोनही नेते जळगावीच मुक्कामाला आहेत. त्यांच्या कार्यक्रमात अजुनतरी काहीही बदल करण्यात आलेला नाही.