नवी दिल्ली, 13 जुलै : गेले काही दिवस विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांची पेटीएम (Paytm) ही कंपनी चर्चेत आहे. कारण ही कंपनी देशातला सर्वांत मोठा IPO शेअर बाजारात सादर करणार आहे. हा आयपीओ या महिन्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. त्या माध्यमातून कंपनी 17-18 हजार कोटी रुपये उभे करू शकते. पहिल्या टप्प्यात थोडे आणि उर्वरित पैसे दुसऱ्या टप्प्यात कंपनी उभारू शकते. यापूर्वी 2010मध्ये कोल इंडिया (Coal India) या कंपनीने अशा पद्धतीने 15,200 कोटी रुपये उभे केले होते. आयपीओ आणण्यापूर्वी या कंपनीने अनेक बदल केले आहेत. कंपनीच्या बोर्डावरून चीनच्या संचालकांना हटवण्यात आलं आहे. तसंच, गेल्या आठवड्यात कंपनीने 5.1 लाख शेअर्स 80 कर्मचाऱ्यांना दिले होते. कंपनीचं मूल्य 1.85 लाख कोटी रुपये असल्याचं मानलं जात आहे. पेटीएम हा डिजिटल व्यवहारांसाठीचा (Digital Transactions) देशातला सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म आहे. पेटीएम कंपनीची यशोगाथा पेटीएम कंपनीचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा आज कोट्यवधी-अब्जावधींचा बिझनेस करत आहेत; पण त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) अलीगढमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांची आई गृहिणी, तर वडील शाळेत शिक्षक होते. विजय शेखर शर्मा 12वीपर्यंत हिंदी माध्यमातून शिकले. ग्रॅज्युएशनसाठी ते दिल्लीला गेले. तिथे त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या विषयात पदवी घेतली. विजय शेखर शर्मा यांचं इंग्रजी फारसं चांगलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी 12वीपर्यंतचं शिक्षण हिंदी माध्यमातून घेतलं होतं; पण कॉलेजमध्ये असताना मात्र त्यांना इंग्लिश कच्चं असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा त्यांनी इंग्लिश शिकण्याचा निश्चय केला आणि त्यानुसार अंमलबजावणीही केली. 1997मध्ये कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी indiasite.net ही वेबसाइट सुरू केली होती. त्यानंतर दोनच वर्षांत त्यांनी ती वेबसाइट काही लाख रुपयांत विकली. त्यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात इथून झाली. त्यानंतर त्यांनी 2000 साली one97 communications या कंपनीची स्थापना केली. न्यूज, क्रिकेट स्कोअर, रिंगटोन, जोक्स, एक्झाम रिझल्ट्स आदींसारखा मोबाइल कंटेंट त्या माध्यमातून दिला जायचा. हीच पेटीएमची मातृसंस्था आहे. दक्षिण दिल्लीत भाड्याच्या एका छोट्या खोलीतून या कंपनीची सुरुवात झाली होती. इंडियन एक्स्प्रेसला पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत विजय शेखर शर्मा यांनी सांगितलं होतं, की ‘मी जेव्हा दिल्लीत राहायचो, तेव्हा रविवार बाजारांत फिरायचो आणि तिथून फोर्ब्ज, फॉर्च्युन अशा मासिकांच्या जुन्या प्रती खरेदी करायचो. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत (Silicon Valley) एका गॅरेजमधून सुरू झालेल्या कंपनीबद्दल मला त्यातूनच कळलं होतं. हे वाचा - जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी मोठी अपडेट, ED चा रत्नागिरी जिल्हा बँकेला ई-मेल! त्यानंतर शर्मा अमेरिकेत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत (Stanford University) शिकायला गेले. भारतात स्टार्टअप्सना काहीही पाठबळ नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या बचतीच्या पैशांतून सुरुवात केली. मित्रमंडळी, नातेवाईकांकडूनही पैसे घ्यावे लागले; पण तेही थोड्याच कालावधीत संपले. शेवटी 24 टक्के व्याजावर 8 लाख रुपयांचं कर्ज त्यांना मिळालं. ‘एक दिवस मला एक सज्जन व्यक्ती भेटली. त्यांनी मला सांगितलं, की त्यांची तोट्यातली कंपनी फायद्यात आणणार असेन, तर ते माझ्या कंपनीत पैशांची गुंतवणूक करायला तयार आहेत. मी त्यांचा व्यवसाय फायद्यात आणून दिला आणि त्यांनी माझ्या कंपनीत गुंतवणूक केली. त्यातून मी कर्ज फेडू शकलं आणि माझ्या व्यवसायाची गाडी रुळावर आली,’ असं शर्मा यांनी सांगितलं होतं. 2001 साली विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम नावाची एक कंपनी सुरू केली. त्या वेळी पेटीएमवर प्रीपेड रिचार्ज, डीटीएच रिचार्ज (Recharge) आदी सेवा दिल्या जायच्या. त्यानंतर विजय यांनी आपल्या कंपनीची व्याप्ती वाढवायचं ठरवलं आणि अन्य बाबींवर लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यातूनच वीजबिल, गॅसबिल भरण्याचीही सुविधा पेटीएमवर उपलब्ध झाली. पेटीएमने हळूहळू अन्य कंपन्यांप्रमाणेच ऑनलाइन व्यवहारांची सुरुवात केली. 2016 साली झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयावेळी कंपनीला मोठा लाभ झाला. त्यानंतर केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत पेटीएमची भरभराट झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.