मलप्पूरम, 28 जुलै : नशीब कधी कुठे कसं आणि केव्हा पलटेल आणि केव्हा काय होईल याचा काहीच नेम नाही. तुम्ही म्हणाल नशीब असावं तर असं याचं कारण म्हणजे कचरा वेचणाऱ्या 11 महिला कोट्याधीश झाल्या आहेत. नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं आणि त्यांची एवढी चर्चा का होत आहे जाणून घेऊया. स्थानिक नगरपालिकेच्या प्लास्टिक कचरा उचलणाऱ्या युनिटमध्ये काम करणाऱ्या अकरा महिला कामगारांना स्वप्नातही वाटले नसेल एवढे पैसे त्यांना एकावेळीच मिळणार आहेत. 11 महिलांनी एकूण 250 रुपये भरून लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती. नियमित आपलं कचरा गोळा करण्याचं काम सुरू होतं आणि अचानक लॉटरी लागल्याचं बातमी वाऱ्यासारखी पसरली. केरळ लॉटरी विभागाने जाहीर केले की, महिलांनी पैसे जमा केल्यानंतर खरेदी केलेल्या तिकिटांना मान्सून बंपर म्हणून 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अडीचशे रुपयांचे लॉटरीचे तिकीट स्वत: एकट्यानं खरेदी करण्याची ऐपतही एका महिलेची नव्हती. मग त्यांनी एक युक्ती केली. सगळ्यांनी थोडे थोडे पैसे काढले आणि त्यांनी अडीचशे रुपये जमा केले.
या महिलांचं कौतुक करण्यासाठी लॉटरी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कचऱ्याच्या गोडाऊनमध्ये आले होते. त्यांच्या या वर्तनामुळे सगळीकडे कचरा गोळा करणाऱ्या महिलांची चर्चा सुरू झाली आहे. या महिलांना मिळणारा पगार अगदी तुटपुंजी आहे. 7 ते 14 हजार रुपये या महिलांना पगार मिळतो. या महिला कचरा गोळा करतात आणि त्याचं वर्गीकरण करतात. या महिलांना मोठा आनंद झाला आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही या मिळालेल्या पैशांमधून कर्ज फेडू शकतो. काही महिला आपल्या मुलीच्या लग्नासाठी हे पैसे वापरणार आहेत. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या महिलांनी याआधी देखील अशा प्रकारचं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. मात्र तेव्हा लॉटरी लागली नाही. त्यानंतर पुन्हा एकदा या महिलांनी हिम्मत करुन तिकीट खरेदी केलं आणि त्यांना लॉटरी लागली आहे.