नवी दिल्ली, 20 जानेवारी: चिनी सैन्याने (Chinese Army) भारतीय हद्दीत घुसखोरी करून अरुणाचल प्रदेशातून (Arunachal Pradesh) 17 वर्षीय भारतीय मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या सुटकेसाठी भाजप खासदाराने केंद्राकडे ट्विट करत विनंती केली आहे. अरुणाचल प्रदेशचे खासदार तापीर गाओ (Tapir Gao)यांनी बुधवारी ही माहिती ट्विट करत दिली. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) राज्यातील भारतीय हद्दीतील अपर सियांग जिल्ह्यातून एका 17 वर्षीय तरुणाचे अपहरण केले आहे. अपहरण झालेल्या तरुणाचे नाव मिराम तारोन असे आहे. अरुणाचल प्रदेशात शियांग नदी भारतात प्रवेश करते त्या ठिकाणाजवळ ही घटना घडल्याचे खासदार गाओ यांनी सांगितले आहे. यापूर्वी मंगळवारी गाओ यांनी ट्विट करत किशोरच्या अपहरणाची माहिती दिली होती. तापीर गाओ यांनी नेमकं ट्विटमध्ये काय म्हटले होते ‘18 जानेवारी रोजी चिनी सैन्याने अरुणाचलमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केली. सीमेवरील अप्पर सियांग जिल्ह्यात लुंगता जोर येथून त्यांनी मीरम तरोन आणि त्याचा मित्र जॉनी यायिंग यांचे अपहरण केले. हे दोघेही झिडो गावातील राहणारे आहेत. यापैकी मीरमचा दोस्त चिनी सैन्याच्या तावडीतून निसटला आहे मात्र मीरमचा कोणताच पत्ता लागलेला नाही. अशी माहिती दिली.
2/2
— Tapir Gao (@TapirGao) January 19, 2022
His friend escaped from PLA and reported to the authorities.
All the agencies of Govt of India is requested to step up for his early release.@narendramodi @AmitShah @rajnathsingh @PemaKhanduBJP @ChownaMeinBJP @adgpi
तसेच, मीरमच्या मित्रानेच संपूर्ण घटनाक्रम भारतीय लष्कराला सांगितला असून मीरमच्या सुटकेसाठी केंद्र सरकारच्या सर्व संबधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती गाओ यांनी केली आहे. गाओ यांनी आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग केले आहे. यासोबतच त्यांनी दोघांचा फोटोदेखील शेअर केला आहे. यापर्वीही चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती.