नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : भारताला (India) अमेरिकेकडून (USA) हार्पून मिसाईल (Harpoon Missiles) मिळणार असल्याचं अमेरिकेकडून जाहीर करण्यात आलं आहे. हार्पून जॉइंट कॉमन टेस्ट सेट (JCTS) ही यंत्रणा भारत अमेरिकेकडून 8 कोटी 20 लाख डॉलर्सला ($8.20 Crore) खरेदी करणार आहे. या यंत्रणेमुळे भारत-अमेरिकेतील व्यापारी संबंध वाढणार असून भारताच्या सागरी सुरक्षेची क्षमता कैक पटींनी वाढणार आहे.
हल्ल्यांपासून मिळणार संरक्षण
भारताला समुद्रातील सुरक्षा मजबूत करण्यासाठी हार्पून मिसाईलचा उपयोग होणार आहे. समुद्रातील नौका, पाणबुड्या आणि इतर साधनांपासून बचाव करणे आणि अशा साधनांना उद्धवस्त करण्यासाठी हार्पून मिसाईलचा भारताला उपयोग होणार आहे. यामुळे भारताची सध्याची आणि भविष्यातील सागरी सुरक्षेची चिंता कमी होणार आहे. हिंद महासागर आणि प्रशांत महासागर परिसरात या यंत्रणेचा वापर होणार असून अमेरिकेनं या कराराबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
भारत-अमेरिका करार
हार्पून मिसाईलबाबत झालेल्या करारानुसार अमेरिका हे मिसाईल पुरवणार असून त्यासोबत इतरही अनेक सुविधा भारताला मिळणार आहेत. त्यामध्ये मिसाईलची देखभाल करण्यासाठी सर्व्हिस सेंटर, स्पेअर पार्ट्स आणि इतर गोष्टींसाठी टेक्निकल डॉक्युमेंट्स यासह भारतातील नौदल अधिकाऱ्यांचं अमेरिकेत प्रशिक्षण पार पडणार आहे. अमेरिकेचा आशिया खंडात प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न म्हणूनही या कराराकडं पाहिलं जात आहे.
हे वाचा -राज्यपालांनी मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करू नये - नवाब मलिक
द बोइंग कंपनी असेल ठेकेदार
द बोइंग ही कंपनी यासाठीची ठेकेदार असून 1977 सालापासून भारताचा हार्पून यंत्रणेशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. सर्व ऋतुंमध्ये ही यंत्रणा प्रभावीरित्या काम करत असून सध्या जगभरातील 30 पेक्षा अधिक देश ही यंत्रणा वापरत असल्याची माहिती आहे. यामुळे भारताची ताकद वाढणार असून अमेरिकेसोबतचे संबंध अधिक दृढ होणार असल्याची प्रतिक्रिया जो बायडन प्रशासनानं दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.