शिर्डी 21 एप्रिल: कोरोनामुळे सरकारचे सगळेच विभाग युद्ध स्तरावर कामाला लागले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांची इतर सर्व कामे बाजूला पडली असून फक्त कोरोनाविरुद्ध लढण्याचं काम त्यांच्याकडे आलंय. त्यामुळे सगळ्याच अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे अधिकारीही झापाटून कामाला लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्या आजोबांचे सोमवारी वृद्धपकाळाने निधन झाले. आजोबांना अंतिम निरोप देण्यासाठी जाण्याऐवजी त्यांनी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याला प्राधान्य दिलं. आपल्या आजोबांचे अंत्यदर्शन त्यांनी व्हिडिओ कॉलव्दारे घेतलं आणी पुन्हा कामाला सुरूवात केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यावर नेवासा तालुक्याची सर्व प्रशासकीय जबाबदारी आहे. ह्या बिकट परिस्थितीला अत्यंत धडाडीने ते सामोरे जात असतानाच नाशिक येथे त्यांच्या आजोबांचे काल सकाळी निधन झाले आणी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु ह्या परिस्थितीतही दुःखाचे सावट बाजूला सारून त्यानी समाजहिताला प्राधान्य दिले.
हे वाचा - संसदेपर्यंत पोहोचला कोरोना, लोकसभा सचिवालयातला कर्मचारी पॉझिटिव्ह
आपल्या आजोबांचे व्हिडिओ कॉलव्दारे अंतिम दर्शन घेऊन त्यांनी करोना मुक्तीसाठी व समाजहितासाठी पुन्हा कार्यास सुरवात केली. एकीकडे आजोबांचे अंत्यसंस्कार सुरू होते तर दुसरीकडे नातू असलेला तहसीलदार नेवासा तालुक्यात घरोघर जावून कोरोना बाधीत कोणी आहेत का? काही लक्षणे दिसताहेत का याची तपासणी करत होता.
हे वाचा - 8000 हून जास्त कोरोनाचे रुग्ण असलेल्या या देशाने 1 जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन
नेवासा सध्या हॉटस्पॉट आहे. शहरात कर्फ्यू लावलेला असून सर्व सेवा ही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत अशा परिस्थितीत आजोबांच्या अंत्यविधीला न जाता तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी आपली सामाजिक जबाबदारी निभावली असून त्यांच्या या धैर्याचं सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.