मुंबई, 29 ऑगस्ट : आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Indian Freedom Struggle) साजरा करत आहोत. या स्वातंत्र्याच्या चळवळीत सामान्य नागरिकांना जुलमी ब्रिटिश सरकारविरोधात चेतवण्याच्या कामात महत्त्वाचं योगदान दिलेला गणेशोत्सव (Ganeshotsav) अगदी दोन दिवसांवर येऊन ठेवला आहे. 31 सप्टेंबर 22 ला भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातली चतुर्थी आहे त्या दिवशी गणपतीबाप्पा अनेकांच्या घरांत आणि सार्वजनिक मंडळांच्या मांडवांत विराजमान होणार आहेत. कोविडच्या (Covid-19) दोन वर्षांत अगदीच साध्या पद्धतीने झालेल्या गणेशोत्सवामुळे यंदा सर्वत्र त्याचं स्वरूप विशाल असणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यांत अनेकांच्या घरी गणपतीबाप्पांच्या पार्थिव मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. काहींकडे दीड, काहींकडे 5, काहींकडे सात आणि बाकी सर्वांकडे 10 दिवस घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. पुणे हे गणेशोत्सवाचं मुख्य केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळाकांनी (Lokmanya Bal Gangadhar Tilak) पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिव जयंती उत्सव साजरे करायला सुरुवात केली आणि जनमानसाच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध प्रेरणा चेतवली. त्याच पुण्यात आजही सर्वांत उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. पण कधी विचार केलाय का की गणपतींचं विसर्जन (Ganesh Visarjan 2022) 10 दिवसांनीच का करतात? त्यामागे असलेल्या कारणाचा महाभारताशी संबंध आहे. (भक्तांसमोर ‘महागाईचे विघ्न’; बाप्पांच्या मूर्तीसह सजावट आणि प्रसादही 25 टक्क्यांनी महागला, VIDEO) असं मानलं जातं की भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. तसंच पौराणिक कथांमधून असंही कळतं की गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशीच महर्षि वेदव्यासांनी गणेश चतुर्थीलाच महाभारत (Mahabharat) या ग्रंथांची रचना सुरू केली. व्यासांनी महाभारत लिहून घेण्याचं काम गणपतीबाप्पांना सांगितलं होतं. बाप्पांनी अट घातली की मी एकदा लिहायला सुरुवात केली की, लेखणी मध्ये थांबवणार नाही. लेखणी थांबली की लिखाण संपलं. गणपतीबाप्पा, तुम्ही विद्वानांचे विद्वान आहात, बुद्धिची देवता आहात. मी एक सामान्य ऋषी आहे त्यामुळे माझ्याकडून श्लोकांची रचना करताना काही चूक झाल्यास तुम्ही ती सुधारून मग लिहावी, अशी प्रार्थना व्यासांनी गणपतीबाप्पांना केली. त्यानंतर लेखन सुरू झालं आणि 10 दिवसांनी ते संपलं. अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi) महाभारत लेखन संपल्यावर गणपतीचं शरीर पुतळ्यासारखं झालं होतं. त्याच्या अंगावर धूळ-माती जमा झाली होती. गणेशाने सरस्वती नदीत स्नान करून आपलं शरीर स्वच्छ केलं. त्यामुळे दहा दिवस गणेशोत्सव झाल्यानंतर बाप्पांच्या मूर्तींचं पाण्यात विसर्जन केलं जातं. गणेशोत्सवाचं अध्यात्मिक महत्त्व असं आहे की या 10 दिवसांत आपण आपल्या मनावरची धूळ दूर करावी. आपले अवगुण कळावेत आणि गुणांचं संवर्धन करता यावं यासाठी गणेशाची आराधना केली जाते. ती करण्यासाठी अखिल विश्व आता सज्ज झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.