अकोला, 20 जून : अकोल्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सचिव तसेच लेखापाल यांनी गेले वर्ष 2019 - 2020 मध्ये संगणमत करून 16 लाख 19 हजार 785 रुपयांचा अपहार केल्याचं लेखापरीक्षण अहवालामध्ये पुढे आले असून याप्रकरणी माजी संचालक यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला दोन्ही आरोपींविरुद्ध दिलेल्या लेखी तक्रारीवरून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे 2013 पासून राजकुमार माळवे हे सचिव तर मंगेश नवीनचंद्र बोंद्रे लेखापाल या पदावर कार्यरत आहेत. वित्तीय वर्ष 1 एप्रिल 2013 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये प्रत्येक वित्तीय वर्षात लेखापरीक्षण अहवालानुसार सचिव राजकुमार यशवंतराव माळवे व लेखापाल मंगेश नवीनचंद्र बोंद्रे यांनी संगणमत करून लेखापरीक्षण अहवालात नमूद केल्याप्रमाणे विभाग आर्थिक बाबतीत केलेले गंभीर आक्षेप व विभाग क वित्तीय वर्षात केलेल्या खर्चामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटची फसवणूक करून स्वतःच्या फायद्याकरीता अपहार केलेला आहे.
सन 2019 - 20 या वर्षाचे लेखापरीक्षण विशेष लेखापरीक्षक सु. देशपांडे यांनी केले असून लेखापरीक्षण अहवालातील आर्थिक बाबतीत केलेल्या गंभीर आक्षेपांमध्ये नमूद केल्याप्रमाणे सन 2019 - 2020 मध्ये सचिव राजकुमार यशवंतराव माळवे व लेखापाल मंगेश नवीनचंद्र बोंद्रे यांनी संगनमताने पदाचा गैरवापर करून अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून 16 लाख 19 हजार 785 रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.
हे ही वाचा-Online देह व्यापार! 20,000 रुपयांत मुली, WhatsApp वर डील; जागा ग्राहकाची!
या प्रकरणी माजी संचालक अतुल माधवराव म्हैसने रा.अकोट, राजकुमार माणिकराव मंगळे रा. धारेल, विलास नाशिकराव साबळे रा. तरोडा या तीन माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रारीवरून सचिव राजकुमार यशवंतराव माळवे रा. कृषी विद्यापीठ परिसर अकोला व लेखापाल मंगेश नवीनचंद्र बोंद्रे रा.जलतारे प्लॉट अकोट यांचे विरुद्ध भादंविच्या कलम 409, 420, व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola News, Money fraud