Home /News /news /

माजी सैनिकाच्या डोक्यात घातली होती तलवार, भाजप खासदाराला अटक कधी?-सचिन सावंत

माजी सैनिकाच्या डोक्यात घातली होती तलवार, भाजप खासदाराला अटक कधी?-सचिन सावंत

जळगाव मधील माजी सैनिक सोनु महाजन यांच्यावर 2016 साली भाजपाचे आमदार उन्मेष पाटील जे आता खासदार आहेत त्यांच्या आदेशावरून हल्ला करण्यात आला.

मुंबई,13 सप्टेंबर : मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून भाजप आणि शिवसेनेत वाद पेटला आहे. आता या प्रकरणात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उडी घेतली आहे. सचिन सावंत यांनी भाजप आमदार  उन्मेष पाटील जे आता खासदार आहे त्यांच्या सांगण्यावरून एका सैनिकावर तलवारीने वार केला होता, या प्रकरणाची आठवण करून दिली आहे. भाजपला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खरंच आदर असता तर जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. त्यांच्यावर 2016 साली हल्ला करण्यात आला त्याची दखलही तेव्हा फडणवीस सरकारने घेतली नाही. तीन वर्षे एफआयआरही दाखल केला नाही. मुंबईतील प्रकरणात निवृत्त अधिकाऱ्याच्या न्यायासाठी धडपडणारा भाजप सोनू महाजनांना न्याय कधी मिळवून देणार, असा परखड सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 'जळगाव मधील माजी सैनिक सोनु महाजन यांच्यावर 2016 साली भाजपाचे आमदार उन्मेष पाटील जे आता खासदार आहेत त्यांच्या आदेशावरून हल्ला करण्यात आला. राज्यात त्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते, तेच गृहमंत्रीही होते तरीही एफआयआर सुद्धा दाखल करुन घेतला नाही. उच्च न्यायालयाने 2019 मध्ये आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु, आजपर्यंत उन्मेष पाटील यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. संरक्षणमंत्री राजनाथसिंह किंवा त्यांच्या आधीच्या संरक्षण मंत्र्यांनेही याची दखल घेतली नाही. राजनाथसिंह सोनु महाजन यांच्यावरील हल्ल्याची दखल घेऊन फोन करणार आहेत का? सैनिका -सैनिकांमध्ये संरक्षणमंत्र्यांनी भेदभाव का करावा? असा सवालही  सावंत यांनी केला. मुंबईत निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेली मारहाण असो वा इतर कोणत्याही व्यक्तीला मारहाण करणे हे निंदनीयच आहे. मुंबईत झालेल्या या प्रकरणात तत्काळ एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जळगाव प्रकरणी तशी तत्परता का दाखवली गेली नाही याचे उत्तर भाजपाने द्यावे. पण, भाजपाचे देशप्रेम, सैनिकांबद्दलचा आदर हे त्यांचेच आमदार प्रशांत परिचारक यांचे सैनिकांबद्दलचे वक्तव्य व जळगावचे महाजन मारहाण प्रकरण यावरून दिसून आले आहे,  आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून माजी सैनिक सोनू महाजन प्रकरणाचा पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असंही सावंत म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: BJP, Congress, Sachin sawant

पुढील बातम्या