Home /News /news /

येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर ईडीचे छापे

येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर ईडीचे छापे

येस बँकेचे आणखी तीन अधिकारी ईडीच्या रडारवर आहे.

मुंबई, 06 मार्च :  येस बँकेवर (Yes Bank Crisis) सरकारने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. आता येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने राणा कपूर यांच्या घरावर छापे मारले आहे. ईडीने आज संध्याकाळी राणा कपूर यांच्या वरळी येथील घरावर छापे मारले आहे. डीएचएलएफ(DHFL)ला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. येस बँकेनं DHFL ला तब्बल 3600 कोटींचं कर्ज दिलं होतं.  राणा कपूर यांनी अधिकारांचा गैरवापर करुन  हजारो कोटी रुपये परदेशात पाठवले. त्याच सोबत काही कंपन्यांना नियम बाह्य अर्थ साह्य केलं असून कानपूर, दिल्ली इथं दाखल एका प्रकरणी ईडी तपास करत होती. त्यातून राणा कपूर यांचे नाव समोर आलंय. राणा कपूर यांच्या घरातील एका व्यक्तीच्या खात्यात वेळो वेळी मोठी रक्कम परदेशातून आल्याची माहिती देखील ईडीला सूत्रांनी दिली. फक्त राणा कपूरच नाही तर यस बँकेचे आणखी ३ अधिकारी ईडीच्या रडारवर असून लवकर त्यांच्यावर देखील ईडीची गाज पडेल, असं बोललं जातंय. दरम्यान, येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर खातेदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. खातेदारांना महिना भरात फक्त 50 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचा परिणाम येस बँकेत पाहायला मिळतोय. ठाणे, भिवंडी, पुणे तसंच राज्यभरातील येस बँकेच्या इतर शाखांमध्ये खातेदारांनी गर्दी केली होती. खातेदारांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन करण्यात येत होतं. बँकेवर आलेल्या निर्बंधामुळं आता आपल्या पैशांचं काय होणार हा प्रश्न खातेदारांना सतावतोय. SBI करणार येस बँकेत गुंतवणूक तर दुसरीकडे, येस बँकेला रुळावर आणण्यासाठी सरकारने प्लान तयार केला आहे. देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय बँक भारतीय स्टेट बँक (State Bank of India) येस बँकेत मोठी गुंतवणूक करणार, असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री ​निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी दिली. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून येस बँकेचे 49 टक्के शेअर्स एसबीआय खरेदी करणार, असल्याचे अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अधिकृत वेबसाइटवर येस बँकेच्या रिस्ट्रक्चरिंगबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, सन 2017 पासूनच येस बँकेच्या आर्थिक व्यवहारावर RBIचं लक्ष आहे. तपास संस्था या प्रकरणी सविस्तर चौकशी करत आहे. मार्च 2019 मध्ये येस बँकेवर RBIनं एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. सप्टेंबर 2019 पासून सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)या प्रकरणी चौकशी करत आहे. गेल्या वर्षी मे आणि जून महिन्यातही येस बँकेला दंड ठोठावण्यात आला होता. सप्टेंबर 2019 मध्ये येस बँकेचे माजी प्रवर्तकांची संपूर्ण भागिदारी विकली होती. दरम्यान, बँकेची तरलता राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली होती. मात्र, याचा काही लाभ होऊ शकला नाही. त्यामुळे नोव्हेंबर 2019 मध्ये हे लक्षात आलं होतं की, येस बँकेला कुठूनही पैसा मिळू शकणार नाही, असंही सीतारामण यांनी यावेळी सांगितलं. सन 2014 च्या आधीपासूनच येस बँकेचा कारभार दबावाखाली होता. यामध्ये एस्सेल ग्रुप, डीएचएफएल, आयएल अँण्ड एफएस आणि व्होडाफोन सारख्या कॉर्पोरेट कंपन्यांचा समावेश आहे. आम्ही ठेवीदारांच्या पैशांवर कोणताही परिणाम होणार नाही. तो सुरक्षित असल्याची ग्वाहीही निर्मला सीतारमण यांनी दिली.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:sachin Salve
First published:

Tags: ED, Raids, Yes bank

पुढील बातम्या